आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अंतर्गत आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५% जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी अॅलॉटमेंट लेटर, हमीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाने २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रेच ग्राह्य शासनाच्या निर्देशानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचे दोन संच सोबत आणणे आवश्यक आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *