सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अखेर सव्वा महिन्याने वाल्मिक कराडवर ‘मोक्का’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका आरोपीला तपास यंत्रणा अटक करू शकलेल्या नाहीत. बीडमधील संघटित गुन्हेगारी हाताळण्यात पोलिस यंत्रणेला अपयश आले आणि गुन्हेगारीला पोलिस यंत्रणेचा कसा आशीर्वाद होता, हे पुढे आले. देशमुख हत्येनंतर मोठ्या आंदोलनानंतर बीडची ही कीड सामोरी आली आहे.
बीड हा महाराष्ट्रासह चार राज्यांना ऊसतोडणी मजूर पुरवणारा जिल्हा. वंजारी समाजाचे या जिल्ह्यातील प्रमाण मोठे. नेते मोठे झाले; परंतु समाज गरीबच राहिला. मुकादमांनी मजुरांना लुटायचे आणि नेत्यांभोवती वावरायचे, असा इथला खाक्या. त्यामुळे मजुरांच्या हालअपेष्टा कमी झाल्या नाहीत. साखर कारखाने उभे राहिले; परंतु ते चालवता आले नाहीत. अलिकडच्या काळापर्यंत येथे मराठा आणि वंजारी समाज एकमेकांना जपत होते. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या दोन समाजांमध्ये दरी निर्माण झाली. मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर ती आणखी वाढली. गुन्हेगारांना जात, धर्म नसतो असे दोन्ही बाजू सांगत असताना ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांची पाठराखण केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्याला वेठीला धरले जात आहे. खोटे गुन्हे दाखल असल्याचे कारण दिले जात आहे. देशमुख यांच्या हत्येपर्यंत हे गुन्हे खोटे होते, असा साक्षात्कार कुणालाच झाला नाही, हा भाग वेगळा. खुनानंतर विधिमंडळात आवाज उठल्यानंतरही राज्य सरकारने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले, ते पाहता संशयाला जागा होती. वारंवार आंदोलने, मागण्या झाल्यानंतर तीन प्रकारच्या चौकशा जाहीर झाल्या. संशयित आरोपींच्या गळ्यात गळे घालणारेच विशेष पथकात होते, तेव्हा त्यावर पुन्हा आवाज उठवावा लागला. त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली, तेव्हा सरकारला जाग आली आणि विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांची नावे बदलली. आता ज्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आहे, ते बसवराज तेली हे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय आहेत, असा आरोप खंडणी आणि हत्येतील संशयित वाल्मिक कराड यांच्या पत्नीने केला आहे.
यापूर्वीच्या काळात पोलिस यंत्रणेने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून काम केल्याने विविध तपास पथकांना बीडमध्ये काम करणे कसे अवघड आहे, हे यंत्रणांवर आता होत असलेल्या आरोपांमधून दिसते. बीडच्या माजी जिल्हा पोलिसप्रमुखांनी तिथल्या गुन्हेगारी आणि राजकारण्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा अहवाल देऊनही सर्वपक्षीय सरकारांनी आतापर्यंत कारवाई न केल्यानेच बीडमध्ये हत्या, खंडणी, अपहरण असे प्रकार वाढत गेले आणि बीडची तुलना बिहारशी होऊ लागली. एकीकडे गुन्हेगारांना जात नसते असे म्हणायचे आणि दुसरीकडे संघटित गुन्हे दाखल असलेल्यांच्या समर्थनार्थ बंद, तोडफोड, जाळपोळ करायची ही बीडची नवी नीती यंत्रणांच्या लक्षात आली होती; परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. वाल्मिक कराडला ‘मोक्का’ लावण्याचे संकेत मिळाल्यामुळे जिल्ह्यात एक दिवस अगोदरच जमावबंदी लागू करूनही प्रत्यक्षात ‘मोक्का’ लागल्यानंतर बीडमध्ये तणाव निर्माण झाला.
दुष्काळाच्या छाताडावर माणुसकीची पेरण करणारा बीड. वारकरी संप्रदायाची पाळेमुळे रुजलेला जिल्हा. घामाच्या सुगंधावर कष्टाची भाकरी फुगवणाऱ्या या जिल्ह्याची आता बदनामी झाली आहे. नावावर गुन्हे असणाऱ्यांना पिस्तूल परवाने, गुन्हे दाखल असलेले शासकीय समित्यांचे प्रमुख, खंडणीसाठी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे गुंडपुंड आणि त्यांना राजकीय आशीर्वाद देणारे; किंबहुना, त्यांच्या व्यवसायात भागीदारी करणारे राजकारणी, कळ्यांना उमलण्याअगोदर नख लावणारे सामान्य, त्यांना साथ देणारे पैशाच्या मोहापायी पेशा विसरणारे डॉक्टर, राखेतून सोने कमवणारी टोळी असे सारे वातावरण तयार झाले असताना बीड, परळीला बदनाम का करता, असे सवाल विचारले जात असतील, तर कोण कुणाला बदनाम करते, याचे एकदा आत्मपरीक्षण करायला हवे. समर्थन करण्यालाही काही मर्यादा असतात. गुन्हेगारी वृत्ती आणि त्यांची कर्मकांडे उघडकीस आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीला दिवसाला सात-आठशे अश्लील मेसेज आणि धमक्या पाठवणाऱ्या बीडमधील समर्थकांची आणि त्यांच्या नेत्यांची मानसिकताही लक्षात यायला हवी. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना सरपंचाला अनंत यातना देण्यात आल्या. तो विव्हळताना त्याचा असुरी आनंद घेणारी ही वृत्ती राज्यच नाही तर देशासमोर आली.
बीडमधील खंडणी, दहशत, टोळ्यांचे राज्य आता समोर आले आहे. या जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्यापासून हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणे एकामागोमाग समोर येऊ लागले. संशयाची सुई काही मंडळीपर्यंत पोहोचली. ‘गंदा है पर धंदा है ये’ म्हणत बीडमध्ये राजकीय गुन्हेगारी पोसली गेली आहे. पोलिसांना भीती वाटावी इतकी दहशत या पट्ट्यात आहे. दहशत, खंडणीचा परळी पॅटर्न देशात बदनाम झाला. अनेकांचे मुडदे पाडल्याचा, जमिनी बळकावल्याचा आरोप होत असताना, इतरांच्या नावे संपत्तीचा, मालमत्तांचा डोलारा उभा होत असताना यंत्रणा डोळे झाकून राहिल्या. राजकीय विरोधकांना धडा शिकवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ‘ईडी’, प्राप्तिकर खाते, ‘सीबीआय’ सारख्या यंत्रणांचा वापर केला जात असताना सर्वपक्षीय नेत्यांशी जुळवून घेणाऱ्या गुंडा-पुंडांच्या वेळी या सर्व यंत्रणा निद्रितावस्थेत का जातात, हे कोडे उलगडत नाही. बीडमधील अशा अनेक ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ धुमाकूळ घालत असताना यंत्रणा त्यांना मिळणाऱ्या वाट्यावर समाधान मानत राहिल्या. त्यांचे आणि टोळयांचे मधुर संबंध सामान्यांच्या मात्र मुळावर उठले होते.
परळीमध्ये कोळशापासून औष्णिक ऊर्जानिर्मिती सुरू झाली. या जळालेल्या कोळशामधून सुकी आणि ओली राख बाहेर येते. ही राख प्रदूषण करते, जमीन नापीक करते अशी ओरड या औष्णिक विद्युत केंद्राजवळील गावातून होत होती. अर्थात याविरोधात अजूनही काही गावांमधील नागरिक आंदोलन करतात. 2010 नंतर परिस्थिती बदलली. ही राख बांधकामांमध्ये, वीट भट्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली आणि अर्थकारण बदलले. या राखेवर माफियांची नजर पडली आणि पुढे या अर्थकारणाने खंडणी माफियांना, राजकीय गुन्हेगारीला बळ दिले. त्यातून उन्माद सुरू झाला. औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, पोलिस, महसूल आणि राजकीय नेत्यांची ‘सोनेरी टोळी’तयार झाली. अनेक गावांमधील तरुण या व्यवसायात उतरले. वर्चस्वासाठी त्यांच्यात मारामाऱ्या, गोळीबार, खंडणी हे धंदे सुरु झाले. या सर्वांमध्ये ‘आका’ उर्फ माफिया तयार झाले. वाल्मिक कराड त्यातील एक. बीडमधील आर्थिक नाड्या त्याच्या हातात आहेत. बदलीपासून निधी वाटपापर्यंत सर्वांवर त्याची पकड. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून एका दिवशी जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख गोळा करण्यात येते. एका ट्रकमागे सरासरी वीस हजार रुपयांची कमाई होते. दिवसाला कमाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचतो. वर्षाला साधारणतः 12-15 हजार कोटींच्या घरात राख विक्रीचे गणित पोहचते. निविदा कुणालाही मिळाली तरी कराडची माणसे सगळा व्यवहार करतात, असा आरोप आहे. कोणी याविरोधात आवाज उठवला, तर तो बंद करण्याची सर्व आयुधे ‘या गँग्स ऑफ वासेपूर’कडे आहे. त्यांचा आका सर्व मॅनेज करत असल्याने या तरुणांना कोणतीही चिंता नसते.
औष्णिक विद्युत केंद्र आणि राखेच्या काळ्या धंद्याव्यतिरिक्त आता जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पांमध्ये आपला हप्ता बांधून घेण्यासाठी ही टोळी सरसावली आहे. पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी मारहाण, अपहरण असे कारनामे करत असतानाच त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली. त्यातून शंभर अपराध पूर्ण झाले आणि एक टोळी संघटित गुन्ह्याखाली आत गेली. मात्र तिच्या कृष्णकृत्यांचा चोख हिशेब घेतला जातो का, ओंगळवाण्या, घृणास्पद खुनांचा सूड उगवला जातो का आणि त्यातून अवघ्या जिल्ह्याला जरब बसेल, असे वातावरण निर्माण करता येते का, हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
(अद्वैत फीचर्स)
