अनिल ठाणेकर
ठाणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत. दररोज विविध उद्बोधक,प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार.रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यंदा येथील या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यातील वंदे मातरम् संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवात १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन – किर्तन होणार आहे. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री ची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळी १० वाजता सामुहिक अर्थवशीर्ष पठण होईल. रात्रौ ८ वा. ‘गणेश तत्व आणि पुराण’ या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार २ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक नृत्य, सोमवार ३ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.धर्मो रक्षति रक्षित: याविषयावर डॉ. अभिजीत फडणीस धर्मजागरण करतील. मंगळवार ४ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. ‘हृदयी वसंत फुलताना’ हा सुप्रसिद्ध कलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित, आणि मनिष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांचा साहित्य, संगीत, आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम होईल. बुधवार ५ फेब्रुवारी रात्रौ ८ वा. ॲड. विमल जैन हे “पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी” या विषयावर उद्बोधक माहिती देतील. गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधाचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये दासबोधाचे निरूपण करणार असुन ७ फेब्रुवारी रोजी महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणुक निघणार आहे. या महोत्सवात होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबीर होणार असुन गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केले आहे.
यावेळी वंदे मातरम संघाचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण,सुशांत मोरे,किशोर भावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
