मुंबई : मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता माटुंगा येथील दादर- माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. हा प्रकाशन समारंभ मान्यवर स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. परिख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, हुसेन दलवाई व डॉ. लता प्रतिभा मधुकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
महाराष्ट्राला सामाजिक व राजकीय लढ्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे ह्या इतिहासाचा वारसा व प्रेरणा घेऊन अनेक तरुण कार्यकर्त्यांनी विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक/राजकीय चळवळीत झोकून देऊन निःस्पृह काम केले आहे. आमदार, खासदार, मंत्री अशी स्वप्ने त्यांना पडली नाहीत किंवा ते अशा गोष्टींसाठी कधी लांगूनचालन करीत बसले नाहीत. अन्यायपीडित, शोषित जातीवर्गांमध्ये ते काम करत राहिले. काहींना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले, तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी निष्ठा कायम ठेवली व सातत्यपूर्वक काम करीत आहेत.
स्वातंत्र्याच्या वीस-पंचवीस वर्षांत भारतीय शोषित वर्गजातींच्या जीवनमानात काही फरक पडत नाही म्हटल्यावर देशभर तरुणांचे उठाव झाले. जागृत बंडखोर तरुण आयुष्याची तमा न बाळगता श्रमिकांच्या या लढ्यात सहभागी झाले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मधुकर म्हणजेच मधु मोहिते याने शोषितांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. अनेक कठीण प्रसंग आले. प्राणघातक हल्ले, टिकाटिप्पणी व आर्थिक विवंचना खूप होती. अशा परिस्थितीत दिलेला संघर्ष त्यांनी त्यांच्या ‘शोध परिवर्तनाचा’ या पुस्तकात नमूद केला आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, मूळ ४०० रुपयांचे हे पुस्तक केवळ २५० रुपयांत मिळेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले आहे.
