पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई
रुद्रपूर ः 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले.
आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले.
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत पूजा हिने हे अंतर एक तास 45 मिनिटे 10.590 सेकंदात पार केले. सुवर्णपदक जिंकणार्या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास 45 मिनिटे 10.512 सेकंद वेळ लागला. स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राने रोड सायकलिंगमधील महिला गटाचे विजेतेपदावर नाव कोरले. ही दोन्ही पदके पूजा दानोळेने जिंकून महाराष्ट्राची शान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचविली आहे.
पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. पूजा हिला सुरुवातीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायकलींग अकादमीत अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.