कबड्डीत महिलांच्या गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत

हरिव्दार ः कबड्डीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल करीत पदकाच्या आशा कायम राखल्या. अटीतटीने झालेल्या लढतीत महाराष्ट्राने पश्चिम बंगाल या तुल्यबळ संघावर 30-22 अशी मात केली.
हरिव्दारमधील योगस्थळी क्रीडा परिसरात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने  विजयी घोडदौड कायम राखली आहे. उपांत्यपूर्व फेरीत  पश्चिम बंगाल विरूध्द खेळताना महाराष्ट्राकडून सोनाली शिंगटे व मंदिरा कोमकर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. रेखा सावंत हिने जोरदार पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. या सामन्यांमध्ये महाराष्ट्रात पुढे बंगालच्या बलाढ्य खेळाडूंचे मोठे आव्हान होते तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवले आणि विजय खेचून आणली.
उपांत्य फेरीत महाराष्ट्राची हरियाणा संघाशी गाठ पडणार आहे. पुरुषांच्या गटात मात्र महाराष्ट्राला आज साखळी गटातील रंगतदार लढतीत पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेशने त्यांना 44-43 असे एका गुणाने पराभूत केले. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा दुरावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *