महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक निशाणा!  पार्थ मानेला पदार्पणातच सुवर्ण,

रुद्रांक्ष पाटीलला रौप्य तर किरण जाधवला कांस्य

डेहराडून ः मराठमोळ्या नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवली. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या १० मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतला, तर जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटील याने रुपेरी यश संपादन केले. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्यपदक मिळाले.
एअर रायफल्स स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत चुरस पहावयास मिळाली. 17 वर्षीय खेळाडू पाथने 252.6 गुण, रुद्रांक्ष याने 252.1 गुण, तर किरणने 230.7 गुणांची नोंद करीत महाराष्ट्राला तिन्ही पदके जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. एका फेरीचा अपवाद वगळता पार्थने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी टिकवत सुवर्ण यश संपादन केले. रुद्राक्ष हा मधल्या टप्प्यात सहाव्या स्थानावर होता. मात्र शेवटच्या चार टप्प्यांमध्ये त्याने एकाग्रता दाखवीत अतिशय अचूक नेम साधले आणि जोरदार मुसंडी मारत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. अर्थात त्याला पार्थ याची आघाडी तोडता आली नाही.
पार्थ हा मूळचा सोलापूरचा खेळाडू असून गेले चार वर्षे तो सुमा शिरूर यांच्या पनवेल येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याने कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत सोनेरी वेध घेतला होता तसेच 2023 मध्ये त्याने सांघिक विभागात भारतात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तो पनवेल येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे.
सोनेरी यशाची खात्री होती : पार्थ
अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचाच विचार केला होता त्या दृष्टीनेच सुरुवातीपासूनच मी अचूक नेम कसा साधला जाईल याचे नियोजन केले होते सुदैवाने माझ्या नियोजनानुसारच घडत गेले. या स्पर्धेत प्रथमच भाग घेताना सुवर्णपदक मिळवता आले याचा आनंद मला खूप झाला आहे असे पार्थ याने सांगितले. जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या राष्ट्रीय चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय आहे आणि अर्थातच ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे ते मी साकार करू शकेन अशी मला आशा आहे असेही पार्थ याने सांगितले
ेमुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्‍या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळविला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. राज्य शासनातर्फे गतवर्षी त्याला शिवछत्रपती पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. मधल्या टप्प्यात सहाव्या क्रमांकावर माझ्यावर थोडेसे दडपण होते तरीही मला पदकाची खात्री होती त्यामुळेच मी शेवटपर्यंत संयम व चिकाटी ठेवीत नेम साधले त्यामुळेच मला रुपेरी कामगिरी करता आली, महाराष्ट्राच्याच पार्थ याला सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे असे रुद्रांक्ष याने सांगितले.
किरण जाधव हा सातारा जिल्ह्यातील भाटणवाडी या गावचा खेळाडू असून त्याने सन 2015 मध्ये सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव सुरू केला. या खेळातील त्याची कामगिरी बघून सेनादलात त्याची निवड झाली. त्याने आतापर्यंत जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याला दोन सुवर्णपदके मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *