Month: January 2025

क्रांतिज्योत महिला विकास फउंडेशन तर्फे ‘थर्टी फर्स्ट ‘ उपक्रम सालाबादप्रमाणे राबवण्यात फॉउंडेशन यशस्वी..

माथेरान : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो. यात पार्टी करून मद्यपान केले जाते. यातून काही जण नशेत वाहन चालवितात. परिणामी अपघात होतात. तसेच भर रस्त्यात किंवा…

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

पुणे : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले…

दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन संपन्न!

ठाणे : मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांचे विनामूल्य प्रदर्शन ठाणे पूर्व येथील महापालिकेचे खुले कलादालनात संपन्न झाले. प्रदर्शनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मंडलिक यांनी हस्ते केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सावंत हे आवर्जून उपस्थित होते. प्रदर्शनात महाराष्ट्रातून विविधांगी सुमारे २५० हून अधिक दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दिवाळीअंक वाचकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती. निशिकांत महांकाळ, विनोद भोईर, हेमंत आळवे, विनोद ठाणेकर आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकांची माहिती व महती सांगून संस्था हा उपक्रम अनेक वर्ष एक सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक लोकांना निदान एकाच ठिकाणी चाळता  यावेत, हाताळता यावेत यासाठी संस्था हा उपक्रम अनेक वर्ष राबवीत आहे असे प्रतिपादन केले. स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.

 कर्णबधिर मुलेही गिरवू लागली ए.आय.चे धडे !

देशातील पहिलाच प्रयोग दापोलीत; अद्ययावत लॅबची उभारणी     ठाणे : नियतीने केलेल्या अन्यायामुळे बोलता आणि कानाने ऐकता न येणार्‍या मुलांसाठी आज अनेक संस्था धडपडत आहेत. या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिकून हिच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजेत म्हणून काही संस्था, व्यक्तींचे काम सुरू आहे. भारतातील पहिली कर्णबधीर मुलांसाठीची ‘ए.आय. आणि रोबोटिक्स’ लॅब स्थापन झाली आहे. दापोली येथील इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील 30 कर्णबधिर विद्यार्थी ए.आय. (कृत्रीम प्रज्ञा) आणि रोबोटिक्सचे धडे घेऊ लागले आहेत. स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून भारतातील ही पहिली कर्णबधिर मुलांसाठीची लॅब निर्माण करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. स्काय रोबोट़िक्सचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. दापोली या ठिकाणी इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ही मोठी उपलब्धी झाली आहे. आज अनेक मोठ्या शाळांमध्ये देखील ए. आय. आणि रोबोटिक्सचे शिक्षण मिळत नाही. मात्र, या संस्थेने बोलता आणि ऐकता न येणार्‍या या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हे शिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी अद्ययावत लॅब तयार करण्यात आली असून आवश्यक संगणक, अभ्यासक्रमाचे सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. या शाळेतील शिक्षिका श्रद्धा गोविलकर या विद्यार्थ्यांना ए.आय. आणि रोबोटिक्सचे धडे देत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी स्वत: पुणे येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ए.आय. व रोबोटिक्सचे धडे देत आहेत. या कर्णबधिर विद्यालयात दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी स्काय रोबोटिक्सने कर्णबधिर विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्यांच्या विकासासाठी प्रेरित करावे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतूने या ठिकाणी ही सुविधा मोफत देण्यात आली आहे. येथील मूकबधिर विद्यार्थी आता ए.आय. व रोबोटिक्सचे धडे घेत असून त्यांनी कोडिंगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. या पुढच्या काळात अ‍ॅप डेव्हलपिंग, गेमिंग असे अभ्यासक्रम देखील त्यांना शिकविले जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्याने प्रकाश निर्माण होणार आहे. दापोली येथील डॉ. गंगाधर विनायक काणे यांनी 1984 मध्ये स्नेहदीप संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या अंतर्गत इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. या विद्यालयातून आजपर्यंत 280 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत. कर्णबधिर असूनही यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग व स्वयंरोजगार सुरू केला आहे. या विद्यालयात कर्णबधिरांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्ययावत आहेत. साऊंड प्रूफ रूम, ऑडिओ मीटर, डॉक्टर स्पीच, समूह श्रवण यंत्र या शिवाय आता संगणक लॅब देखील अद्ययावत झाली आहे. कोट स्नेहदीप़ संस्थेच्या अध्यक्ष म्हणून स्मिता सुर्वे या कार्यरत आहेत तर कर्णबधिर विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून दीपक हर्डीकर हे यशस्वीपणे काम करीत आहेत. नव्या ए.आय. व रोबोटिक्स लॅब संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या शाळेतील विद्यार्थी खरेतर नशिबवान आहेत. आज अनेक चांगल्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतदेखील ए.आय. आणि रोबोटिक्सची लॅब नाही. मात्र, आमच्या कर्णबधिर मुलांना हे शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले आहे. ही मुले सामान्य मुलांपेक्षा कुशाग्र बुद्धीमत्तेची असतात. त्यांना आता ए.आय. आणि रोबोटिक्सची आवड लागली आहे. डॉ. दीपक हर्डीकर, दापोली ०००००

बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गृहनिर्मिती एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवनगरसाठी भूसंपादन अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल. ठाणे – बोरिवली २० मिनिटांत ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. 00000

 धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती   मुंबई : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे. ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. 00000

 जुन्या इमारतींतील रहिवाशांची पात्रता यादी संकेतस्थळावर दिसणार!

 दलालांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी उपाय   मुंबई : शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली रहिवाशांची पात्रता यादी आता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याच्या नावाखाली दलालांकडून होणारा हस्तक्षेप त्यामुळे बंद होणार आहे. म्हाडाने ही संपूर्ण प्रक्रिया ॲानलाईन करुन दलालांचा रहिवाशांशी येणार संपर्क कमी केला आहे. यानुसार सुरुवातीला दोन हजारांहून अधिक रहिवाशांची पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण करून ही यादी तयार होणार असल्यामुळे आता मूळ रहिवाशाची सदनिका परस्पर हडप करण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे. त्यानंतर सर्वच इमारतींतील रहिवाशांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. पात्रता निश्चित झाल्यामुळे संबंधित रहिवाशांना पुनर्विकासाच्या वेळी फायदा होणार आहे. रहिवाशांची पात्रता यादी तयार नसल्याचे कारण पुढे करीत काही इमारतींचा पुनर्विकास पुढे सरकू शकला नव्हता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आता पात्रता यादीत फेरफार होण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार गृहनिर्माण विभागानेही असा कार्यक्रम सादर केला असून त्यात या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात १३ हजारहून अधिक जुन्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास सुरू असून रहिवाशांची पात्रता यादी उपलब्ध नसल्यामुळे पुनर्विकासाचा गाडा पुढे सरकत नसल्याची बाब उघड झाली आहे. या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाल्यास पात्रता यादीमुळे अडथळे येऊ नयेत, यासाठी रहिवाशांची पात्रता यादी तयार करून ती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे गृहनिर्माण विभागाने ठरविले आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. मात्र मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्याशिवाय महापालिकेकडून पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही. ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी रहिवाशांची पात्रता यादी महत्त्वाची असते. मात्र बऱ्याच वेळी या पात्रता यादीत घोळ असतो. परिणामी पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली जाते. त्यामुळेच पुनर्विकास सुरू होण्याआधीच पात्रता यादी उपलब्ध असेल तर प्रक्रिया लवकर मार्गी लागू शकते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 00000

हक्काच्या घरांसाठी उद्या म्हाडा भवनावर मोर्चा

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी हक्काचे घर द्यावे, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी २ जानेवारी रोजी म्हाडा भवनावर मोर्चा काढणार आहेत. निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. या पुनर्विकासात येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. या संक्रमण शिबिरातील ८० कुटुंबांना अन्य संक्रमण शिबिरातील गाळे वितरीत करण्यात आले आहेत. आम्ही ४० वर्षांहून अधिक काळ संक्रमण शिबिरात राहत आहोत, आता आणखी किती वर्षे संक्रमण शिबिरात राहायचे ? असा मुद्दा उपस्थित करीत या संक्रमण शिबिरार्थींनी निर्मलनगर पुनर्विकासातच ८० जणांना कायमस्वरुपी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी करीत संक्रमण शिबिरातील गाळे रिकामे करण्यास नकार दिला. यासाठी काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय संक्रमण शिबिरार्थींच्या विरोधात गेला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्चा न्यायालयात आव्हान दिलेे. तसेच निर्मलनगर पुनर्विकासातच कायमस्वरुपी घरे देण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता म्हाडा भवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिली. 00000

 जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर कुणाल खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण

 पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव   राज भंडारी पनवेल : लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरणं म्हणजे नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुणालचे पिता सिद्धार्थ खरात हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहत होते. ते पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार शेडमध्ये शासकीय सेवेत होते. सन 1994 साली ते पनवेलमध्ये राहण्यास आले. त्यांना एकूण 3 मुलगे आहेत. मोठा शशांक आणि त्याच्या पाठीमागे कुणाल आणि मृणाल ही जुळी भावंडे असा त्यांचा परिवार. कुणाल आणि मृणालचा जन्म सन 1998 साली पनवेलमध्येच झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारा कुणाल हा नक्कीच उच्च स्थानी जाईल असा विश्वास घरातील सर्वांनाच होता. सुरुवातीचे शिक्षण हे नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर येथून सुरु केले आणि दहावीपर्यंत कुणाल एकाच शाळेत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्याने पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीए च्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण देखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले. नुकत्याच पार पडलेल्या सीएच्या परीक्षेत त्यांनी प्रयत्न केले. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सीएच्या परीक्षेतील आपल्या सहाव्या प्रयत्नाचे सातत्य राखत त्याने यश संपादित करून तो उत्तीर्ण झाला. कुणालच्या या यशामध्ये त्याचे आई – वडील, भाऊ, मित्र परिवार, तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जैन अँड सन्स मधील सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे त्याने बोलताना सांगितले. कुणालच्या या नेत्रदिपक यशानंतर त्याच्यावर नातेवाईक, मित्र परिवारासह पनवेलमधील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ००००००

 सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची गरज

 सुजाता सौनिक यांची सूचना   हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. मुंबईत मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा तयारी आणि नाशिकशी संबंधित विविध विषयांवर बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यास आता केवळ दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे. सरकारने कुंभमेळा नियोजनासाठी जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत. नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर पालिकेसह अन्य विभागांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आराखडे तयार केले आहेत. सिंहस्थासाठी आवश्यक कामांचे सुक्ष्म नियोजन करून कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी  दरम्यान कुंभमेळा होत आहे. काही विभागातील अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन अभ्यास करावा, असे सौनिक यांनी सूचित केले. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपोवन परिसरात ३१८ एकर जागा निश्चित केलेली आहे. सिंहस्थ कालावधी वगळता उर्वरित ११ वर्षात या जागेचा कुठलाही वापर होत नाही. या जागेचा उपरोक्त काळात कसा वापर करता येईल याचा विचार करण्यास सौनिक यांनी सांगितले. गोदावरीचा नदीकाठ परिसर हिरवागार कसा करता येईल, यावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. महापालिकेने नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. राज्य सरकारकडून त्याचा पाठपुरावा करण्याचे मान्य करण्यात आले. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासंबंधीच्या नियोजनावर चर्चा झाली. शहरात मेट्रोनिओसह इलेक्ट्रिक मेट्रोवर चर्चा होत आहे. शहराच्या दृष्टीने कोणता प्रकल्प योग्य ठरू शकतो, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले. ०००००