इंटरनेट आणि ‘सोशल मीडिया’वर टोमॅटोमध्ये निकोटीन असल्याचा दावा केला जात आहे. धूम्रपान सोडत असाल तर या काळात टोमॅटो खाऊ नये, कारण ते धूम्रपानास चालना देते, असा मजकूर दिसतो; परंतु त्यात तथ्य नाही. उलट, टोमॅटो खाल्ल्याने हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
टोमॅटोमध्ये खरोखर निकोटीन असते का? याचे उत्तर होय आहे. बटाटे, टोमॅटो आणि वांगी यांसारख्या अनेक भाज्यांमध्ये निकोटीन असते. तथापि, त्याचे प्रमाण इतके कमी आहे, की त्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होणे कठीण नाही; परंतु अशक्य आहे. टोमॅटो खाल्ल्याने धूम्रपानाची इच्छा होऊ शकते, असे आतापर्यंतच्या कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासातून समोर आलेले नाही. 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनच्या 10 हजाराव्या भागाइतके निकोटीन असते.
या भ्रामक तथ्यांव्यतिरिक्त, टोमॅटो ही एक अतिशय फायदेशीर भाजी आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि ल्युटीनसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये असलेले पोषक न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोग, टाइप 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
टोमॅटोचे पौष्टिक मूल्य
टोमॅटोमध्ये सुमारे 95 टक्के पाणी असते. उर्वरित पाच टक्क्यांत प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. त्यात साखर, प्रथिने आणि चरबीदेखील असते. टोमॅटोमध्ये आश्चर्यकारक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजेदेखील असतात.
रोज एक टोमॅटो खाण्याचे 10 मोठे फायदे
रोज एक टोमॅटो खाल्ल्याने अनेक फायदे होतात. याशिवाय हिवाळ्यात हे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करते. टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन फ्री रॅडिकल्सशी लढून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. म्हणूनच लाइकोपीन समृद्ध टोमॅटो फुफ्फुस, पोट किंवा प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकतात. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, टोमॅटो स्वादुपिंड, कोलन, घसा, तोंड आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते
टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि रक्तदाब कमी करण्यासदेखील मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि ई आणि अँटीऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्सदेखील हृदयाचे आरोग्य सुधारतात.
निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करते
टोमॅटोमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाची संयुगे असतात, जे स्मार्टफोन आणि संगणकासारख्या डिजिटल उपकरणांच्या निळ्या प्रकाशापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
टोमॅटोमुळे दमा आणि श्वसनाचे आजार टाळता येतात. एम्फिसीमापासून संरक्षण करू शकते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये फुफ्फुस हळूहळू खराब होऊ लागतात. टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट धूर आणि इतर हानिकारक पदार्थांशी लढून फुफ्फुसांचे संरक्षण करतात.
स्ट्रोक प्रतिबंधित करते
रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्यास पक्षाघाताची शक्यता कमी होऊ शकते. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, टोमॅटो खाल्ल्याने जळजळ कमी होऊ शकते. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करू शकते. या सर्व गोष्टी स्ट्रोक टाळण्यास मदत करू शकतात.
तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
लाइकोपीन हिरड्या जळजळ आणि रोगापासून संरक्षण करते. तथापि, जास्त प्रमाणात कच्चे टोमॅटो खाल्ल्याने त्यात असलेल्या ॲसिडमुळे दातांच्या इनॅमलला नुकसान होऊ शकते. टोमॅटो खाल्ल्यानंतर लगेच दात घासल्याने आणखी नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला ब्रश करायचा असेल तर टोमॅटो खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटे थांबा.
त्वचेचे नुकसान टाळते
उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक टोपी किंवा सनस्क्रीन वापरतात. टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन टोमॅटोचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते. त्याचप्रमाणे ते आपल्या त्वचेचेही संरक्षण करते. याशिवाय ते त्वचेच्या आतील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते.