अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कल्याण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. इस्लामपूर शाखेची ‘व्हाय नॉट’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. नवी मुंबई शाखेच्या ‘राडा’ या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर बीड शाखेच्या ‘विच्छेदन’ या एकांकिकेस उत्तम तर सोलापूर महानगर शाखेच्या ‘दोरखंड’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सहकार्यवाह सुनिल ढगे, नियामक मंडळ सदस्य तथा स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक इस्लामपूर शाखेचे अभिषेक पवार, श्रेया माने, उत्कृष्ट दिग्दर्शन बीड शाखेचे मनोज जाधव तर उत्तम दिग्दर्शक पारितोषिक नवी मुंबई शाखेचे षण्मुखानंद आवटे यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सौमित्र कागलकर व सोनाली मुसळे इस्लामपूर शाखा यांना तर उत्कृष्ट अभिनयासाठी अनंत साळवी नवी मुंबई शाखा व गायत्री गायकवाड, नाशिक यांना तर उत्तम अभिनयासाठी अभिषेक इनकर बीड शाखा व भावना चौधरी, नागपूर शाखा यांना पारितोषिक देण्यात आले. तर अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र श्रेया माने व रविंद्र वाडकर यांना देण्यात आले.
नेपथ्यसाठी सर्वोत्कृष्ट सोमनाथ लोखंडे (सोलापूर महानगर शाखा), उत्कृष्ट नेपथ्य शरद भांगरे (बीड शाखा), उत्तम नेपथ्य प्रतिक विसपुते (नाशिक शाखा) तर प्रकाश योजनेसाठी उत्तम पारितोषिक ऋषभ धापोडकर (नागपूर), उत्कृष्ट पारितोषिक दीपक देसाई (नवी मुंबई) तर सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पारितोषिक नितेश फुलारी (सोलापूर महानगर शाखा) यांना देण्यात आले. पार्श्वसंगीत उत्तम पारितोषिक किरण सहाणे (नवी मुंबई), उत्कृष्ट पारितोषिक ओम देशमुख (नाशिक) तर पार्श्वसंगीत सर्वोत्कृष्ट पारितोषिक साक्षी करनाळे (इस्लामपूर) यांना देण्यात आले.
या स्पर्धेत १६ शाखांनी भाग घेतला होता. या अंतिम फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण रविंद्र पाथरे, अभिनेत्री आदिती सारंगधर व मिलिंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाट्य परिषदेचे कर्मचारी विशाल सदाफुले यांनी केले तर आभार स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.