‘तेच’ आकडे, ‘तेच’ मशीन, तीच सेटींग : संजय राऊत
मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, संजय राऊत यांनी मतचोरीचा आरोप लावला आहे. तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे, अेस म्हणत त्यांनी हा विचारांचा विजय नाही, हा पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत? असे विचारले असता राऊत म्हणाले, “जर आपण विधानसभेचे निकाल बघितले असतील, तर तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे. १२०-१२५ भारतीय जनता पक्ष, ५४ विधानसभेला आणि येथेही आणि ४०-४२ अजित पवार, आकडे तेच आहेत ना. त्याच मशीन तेच सेटिंग कायम आणि तोच पैसा, ही आपली लोकशाही आहे. आपण आकडे बघाना. आकड्यांमध्ये अजिबात बदल झालेला नाही. भारतीय जनता पक्षाने मशीन त्याच पद्दतीने सेट केल्या. तेच आकडे रहायला हवेत. आकडे तरी बदलायला हवे होते. यामुळे पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतही त्याखाली झोपले गेली.”
राऊत पुढे म्हणाले, “एक लक्षात घ्या, तीस कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे १५०-१५० कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट तीस कोटी आहे आणि खर्च किती होतोय, तर १०० कोटी, १५० कोटी. नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत प्रचाराला चार्टर्ड फ्लाइट आणि हेलिकॉप्टर वापरले नाही. त्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षांतच होती, कोण पुढे जातंय? स्पर्धा आमच्यासोबत, विरोधी पक्षासोबत नव्हतीच. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांविरुद्ध खेळत राहिले आणि पैशांची गारपीट झाली. लोकांनाही पैसे घेऊन मतदान करायची सवेय झालीय.”अशी टिका त्यांनी केली.
