ठाणे जिल्ह्यात १८६ ॲट्रोसिटीचे गुन्हे
ठाणे – मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत ठाणे शहर व ग्रामीण, नवीमुंबई, मिरा-भाईंदर या पोलीस विभागांच्या हद्दीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत एकूण १८६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये खून, बलात्कार, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ व जाळपोळ यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
या १८६ गुन्ह्यांपैकी १०२ अत्याचारित व्यक्तींना शासनामार्फत एकूण ४२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात आले आहे. मात्र, उर्वरित ८४ प्रकरणांमध्ये जातीचा दाखला, एफआयआरची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने अर्थसहाय्य देणे प्रलंबित राहिले आहे. कागदपत्रांच्या अभावामुळे पीडितांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
