शनीशिंगणापूरप्रमाणे भाजपालाही दारे नाहीत- सुधीर मुनगंटीवार
नागपूर : “जसे शनीशिंगणापुरला दरवाजे नसतात, तसेच आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो. या सगळ्या गोष्टींचा पराभव चंद्रपुरमध्ये पक्षाच्या पराभवात झाले अशी स्फोटक प्रतिक्रीया भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी केली. विदर्भातील १०० नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल ५५ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात २७ पैकी २२ नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवला आहे. मात्र, चंद्रपूरमध्ये भाजपला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यानंतर मुनगंटीवारांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती.
मी नाराज नाही पण योग्यवेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आहे. कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी निश्चित माझी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे वठवतो. पक्षाने मला जेव्हा जेव्हा शक्ती दिली तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढावी यासाठी काम केलं. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज कशाला असेल, नाराजी जनतेत असेल. मंत्रिपद येतं आणि जातं, मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे त्यांचंही येणार आहे जाणार आहे, परमनंट कोणीच नाही, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपलं परखड मत मांडलं. तसेच, उत्तमोत्तम काम करायचं हेच फक्त आमचं काम आहे, असेही त्यांनी म्हटले.
