बीड: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड येथील मकोका न्यायालयात वाल्मिक कराड गँगवर सरपंज संतोष देशमुखांच्या खुनाचे आरोप निश्चित झाले. यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पहिल्यांदाच मौन सोडून न्यायालयासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने पुढील कारवाई सुरू ठेवली.
न्यायाधीशांनी १८०० पानांच्या दोषारोपपत्रातील संपूर्ण घटनाक्रम आरोपींना वाचून दाखवला. “तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का?” असा थेट प्रश्न जेव्हा विचारला गेला, तेव्हा वाल्मिक कराडसह सर्व सहा आरोपींनी “मान्य नाहीत” असे उत्तर दिले. यावेळी कराड स्वतःहून म्हणाला, “मला काही बोलायचे आहे.” मात्र, कायद्याच्या प्रक्रियेनुसार आता प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुराव्यांचे काम सुरू होणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, ‘आबाडा‘ कंपनीकडून मिळणाऱ्या खंडणीच्या व्यवहारात संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते. याच रागातून आरोपींनी त्यांना टाकळी शिवारात नेऊन अमानुष मारहाण केली. आरोपींनी केवळ हत्या केली नाही, तर त्याचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो काढून त्या क्रूरतेचा आनंद साजरा केला. हे व्हिडिओ आता आरोपींच्या वकिलांना देण्यात आले असून, हेच व्हिडिओ या खटल्यातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहेत.
आजच्या सुनावणीनंतर उज्वल निकम यांनी आरोपींच्या वकिलांवर खटला लांबवणे आणि दिशाभूल करणे असा गंभीर आरोप केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होईल.
