छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचा अनुभव देणारा शिवसंस्कार महोत्सव
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कालातीत मूल्ये आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने, कल्याण एज्युकेशन सोसायटी यांच्या श्रीमती के. सी. गांधी शाळेच्या आयोजनाखाली आणि सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘शिवसंस्कार महोत्सव २०२६’ हा पाच दिवसीय शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम दि. ६ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान कल्याण पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण नसून, आजच्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि नागरिकांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकात्मतेची जाणीव करून देणारा अनुभवप्रधान उपक्रम आहे. गेली पंधरा वर्षे सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अनमोल वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
शिवसंस्कार महोत्सव २०२६ अंतर्गत ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन’ हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. हे कलादालन दि. ६ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत नागरिकांसाठी शाळेच्या पटांगणात खुले राहणार आहे. या शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनासाठी ज्या शाळांनी सकाळच्या वेळचे स्लॉट्स नोंदविले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
