माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी
अनिल ठाणेकर
ठाणे : शिवसेना (शिंदे)चे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली. अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केला होता. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आपल्या शेकडो समर्थकांसह पक्ष प्रवेश केला. यावेळेस डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय ठाकूर , आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौर्यावर गेले होते. ते पुन्हा आमच्याकडे आले आहेत. अक्षय ठाकूर यांचे आजोबा महादू कान्हा ठाकूर हे ठामपाच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते. आनंद ठाकूरही नगरसेवक होते. आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार असणार आहेत, असे सांगितले. दरम्यान, शरदचंद्र पवार आणि डॉ.जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो, याची आपणाला खात्री पटल्यानेच आपण हा प्रवेश केला असल्याचे अक्षय ठाकूर यांनी सांगितले.
