ठाणे जिल्ह्यात नवीन कामगार कायद्यांबाबत मार्गदर्शन
कल्याण : केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर हे नवीन कायदे बाबत माहिती सर्वांना व्हावी तसेच भारतीय मजदूर संघाची या कायद्याविषया संदर्भातील भूमिका स्पष्ट व्हावी, या उद्देशाने नवीन कामगार कायदे बाबत मार्गदर्शन मेळावा रविवारी विनायक सभागृह गणेश मंदिर संस्थान डोंबिवली पूर्व येथे भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याची सुरुवात बेबीनंदा कांबळे यांनी श्रमिक गीताने केली. तद्नंतर मान्यवरांचे हस्ते भगवान विश्वकर्मा, भारतमाता आणि श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांच्या हस्ते मान्यवरांचा स्वागत व परिचय करण्यात आला. या कार्यक्रमात कल्याण जनता सहकारी बँकेचे सीईओ अनंत कुलकर्णी उपस्थित होते. भा. म. संघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगीर यांनी नविन कामगार कायदयांसंदर्भात मार्गदर्शन केले. जुने सर्व क्लिष्ट कायदे एकत्रित करून सुटसुटीत असे चार लेबर कोड करण्यात आले असून त्यांचा वापर करणे अत्यंत सोपे जाणार आहे. कामगारांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कुणीही खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले केंद्रीय कार्यसमिती सदस्य आणि ट्रस्ट व ऑडिट विभागप्रमुख मोहन येणुरे यांनी बदललेल्या नविन कायद्यांची अंमलबजावणी व आवश्यकता या बद्दल माहिती दिली. सदरचे कामगार कायदे तयार होत असताना भारतीय मजदूर संघाने पार पाडलेली भूमिका त्यांनी समजावून सांगितली. कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांनी नविन कामगार कायदे जास्तीत जास्त कामगार वर्गापर्यंत पोचवण्याची ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योगांमध्ये मार्गदर्शन मेळावे घेण्यात यावे असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव विलास आंबेकर यांनी केले. कार्यक्रमात नविन कायद्यांन संदर्भात माहिती देणारे पत्रक वाटप करण्यात आले व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
