एचआयव्ही बाधितांच्या जीवनात नवी पहाट
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘वधू-वर मेळाव्या’ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग आणि एआरटी विभागाच्या पुढाकारातून आणि नेटवर्क इन ठाणे बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही/एड्स (NTP+) या संस्थेच्या सहकार्याने एचआयव्ही उपचार घेत असलेल्या व्यक्तींसाठी आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळावा शनिवारी यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, एकूण २२४ उमेदवारांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला.
या मेळाव्यासाठी केवळ ठाणे,मुंबई जिल्ह्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून उमेदवार सहभागी झाले होते. एचआयव्ही बाधित व्यक्तींमध्ये वाढत असलेला आत्मविश्वास, सामाजिक स्वीकार आणि मुख्य प्रवाहात येण्याची तयारी या सहभागातून स्पष्टपणे दिसून आली. सन २००४ मध्ये स्थापन झालेली NTP+ संस्था गेल्या दोन दशकांपासून एचआयव्ही बाधित व्यक्तींच्या हक्क, सन्मान व पुनर्वसनासाठी कार्यरत असून, सध्या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे. विविध क्षेत्रीय उपक्रमांद्वारे आणि आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधत संस्था एचआयव्ही बाधितांना सामाजिक व मानसिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ART विभाग रुक्मिणीबाई रुग्णालय येथून HIV बाधित रुग्णांना नियमित उपचार दिले जातात. सद्यस्थितीत महापालिकेचे समुपदेशन आणि तपासणी केंद्र बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि गीता हरकिसनदास दवाखाना कोळशेवाडी या ३ ठिकाणी कार्यरत आहे.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मान्यवरांनी नमूद केले की, “एचआयव्ही ही आता प्रभावी उपचारांमुळे नियंत्रणात ठेवता येणारा आजार आहे. नियमित उपचार, वैद्यकीय सल्ला आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तीही निरोगी, सन्मानजनक व सुखी वैवाहिक आयुष्य जगू शकतात.” या वधू-वर मेळाव्यामुळे समाजातील भीती, कलंक आणि गैरसमज दूर करण्यास मदत होणार असून, सहभागी उमेदवारांचे धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. ART विभाग, KDMC आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम एचआयव्ही बाधित व्यक्तींच्या जीवनात नव्या आशेची दारे उघडणारा ठरेल.
