नंदुरबारमधील शासकीय आश्रमशाळेत मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा तीव्र निषेध
ठाणे : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करते. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी एसएफआयचे राग्य अध्यक्ष रोहिदास जाधव व राज्य सचिव सोमनाथ निर्मळ यांनी केली.
या प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्र दिवसेंदिवस मुलींसाठी असुरक्षित बनत चालले आहे, हे सिद्ध होते. य घटनेत तर खुद्द मुख्याध्यापकच आरोपी असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. संबंधित आरोपीस वसतिगृह महिला अधीक्षिकेने मदत केल्याचे भयंकर प्रकरण आहे. या दोघांवरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. त्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही, तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावली पाहिजे.त्यासोबतच, एसएफआय सातत्याने शैक्षणिक परिसरात मुलींच्या सुरक्षिततेसाठी ‘जेंडर सेन्सिटायझेशन कमिटी अगेन्स्ट सेक्सुअल हरासमेंट (जीएस-सीएएसएच/जीएस-कॅश)’ ही समिती सर्वत्र कार्यान्वित करण्याची मागणी करते. या प्रकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा समित्या आणि युनिट्सनी तीव्र आंदोलन संघटित करावे अशी मागणी एसएफआयचे राग्य अध्यक्ष रोहिदास जाधव व राज्य सचिव सोमनाथ निर्मळ यांनी केली.
