पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमातून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीतील मतदान प्रक्रियेचा व्यापक प्रचार
नवी मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने होत असून मतदारांनी कशा पध्दतीने मतदान करायचे याविषयी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये होर्डींग, बॅनर्स, डीजीटल होर्डींग, रिल्स, चित्रफिती, सोशल मिडीया अशा सर्वच माध्यमांव्दारे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
यात मनोरंजनातून माहिती व प्रबोधन करणा-या पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाचाही उपयोग केला जात असून निवडणूकीसाठीच्या ‘मतदार शिक्षण, जागृती आणि साक्षरता कार्यक्रम अर्थात SVEEP’ अंतर्गत मोठ्या प्रमाणात संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात जनजागृती केली जात आहे.
महानगरपालिका क्षेत्रात दररोज विविध भागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सकाळच्या सत्रात पथनाट्याचे ५ प्रयोग व संध्याकाळच्या सत्रात ५ प्रयोग अशाप्रकारे दिवसामध्ये वेगवेगळया ठिकाणी १0 प्रयोग करण्यात येत असून त्यामधून निवडणूकीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता हसत खेळत आवाहन करण्यात येत आहे तसेच बहुसदस्यीय प्रभागांकरिता करावयाच्या मतदान पध्दतीची माहिती प्रसारित करण्यात येत आहेत.
या पथनाट्यांना नागरिकांचा ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत असून सोप्या पध्दतीने बहुसदस्यीय पध्दतीत मतदान कसे करायचे याची माहिती मिळत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
२९ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात बेलापूर विभागात रमाबाई नगर, बेलापूर स्टेशन पूर्व भाग, बेलापूर स्टेशन पश्चिम भाग, डि मार्ट समोरील चौक तसेच संध्याकाळच्या सत्रात सिवूड स्टेशन पश्चिम भाग, येवले चहा समोरील चौक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, करावे तलाव परिसर आणि बेलापूर गाव मुख्य चौक या ठिकाणी निवडणूक विषयक जनजागृतीपर पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. आजही सकाळपासून नेरुळ विभागामध्ये वेगवेगळया ठिकाणी पथनाट्य करण्यात आली आहेत.
