मागे वळून पाहताना…
२०२५ हे वर्ष आपला पसारा आवरुन निरोप घेत आहे. मात्र त्याच्या पोतडीत बऱ्या-वाईट स्मृतींचे मोठे गाठोडे आहे. हसू आणि अश्रूंचे गहिरेपण निमुटपणे सावरत अस्ताला जाताना ते काहीसे केविलवाणेही दिसत आहे. पण हाच तर निसर्गाचा नियम आहे. गळू पाहणारे प्रत्येक पान हुरहुर वाढवते, पण खाली उमलू पाहणारा कोंब नव्याने जगण्याची उर्मीही देऊन जातो. सध्याचे युग तंत्र, यंत्राचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या घरामध्ये प्रवेश करुन स्थिरावले आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेची पुटे सामान्यांच्या निसर्गदत्त बुद्धीवर स्पष्ट दिसू लागली आहेत. वाचन, चतन, मनन या पातळ्या टाळून हवे तसे व्यक्त होणाऱ्यांचे प्रमाण हे प्रकर्षाने दर्शवून देत आहे. आता घरातल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या यंत्रांची मांदियाळी वाढू लागली असून माणसांची संख्या कमी होत आहे. म्हणजेच घरातील जिवंतपणा कमी होणे, राहण्यासाठी घराचे क्षेत्रफळ वाढवण्याच्या नादात घरापासून, आपल्या माणसांपासून जास्तीत जास्त काळ दूर राहण्याची अपरिहार्यता स्विकारणे आणि प्रत्येक दिवशी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त व्हायला हवे, हा विचार अंगिकारत पुढे जाणे ही या बदलत्या काळातील नोंद घेण्याजोगी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. आजूबाजूच्या स्थितीचा मागोवा घेता प्रकर्षाने जाणवणारे हे मुद्दे आहेत. तेव्हा येत्या वर्षात याच मानसिकतेनिशी प्रवेश करायचा की तारतम्य राखत, यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची दखल घेत योग्य मार्गाकडे वळायचे आणि जगण्यातील कृत्रीमता टाळून अकृत्रीम जीवनशैलीचा आग्रह धरत नव्या वर्षात पाय ठेवायचा, हे प्रत्येकाने ठरवायला हवे.
इतर वर्षांप्रमाणे हे वर्षदेखील संमिश्र घटनांनी गजबजले. त्यात काही सुखद होत्या तर काही अतीव दु:ख देऊन गेल्या. प्रगती आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक म्हणूनही आपण 2025 चा उल्लेख करु शकतो, कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यंदा अनेक यशस्वी उपग्रह प्रक्षेपण केले. ‌‘चंद्रयान-3‌’ मोहिमेनंतर, मार्स ऑर्बिटर आणि विविध उपग्रहांच्या प्रकल्पांमुळे भारताची जागतिक अंतराळ क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत झाली. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हे उपक्रम देशाच्या संशोधन आणि विकास क्षमतेचे द्योतक ठरले. सरत्या वर्षात भारताने अवकाशातही ऐतिहासिक धाडसी टप्पा गाठला. भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला सहा जून 2025 रोजी यशस्वीरित्या अंतराळात गेले आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांचा हा प्रवास तसेच तेथे त्यांनी केलेले संशोधन भारतामध्ये आनंदलहरी उत्पन्न करुन गेले, कारण 1984 नंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय मानव अवकाशात दाखल झाला होता. या मोहिमेने जागतिक स्तरावर भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेचा ठसा उमठवलाच; खेरीज भविष्यातील भारताच्या स्वदेशी गगनयान मानव अंतराळ मोहिमेसाठी उपयुक्त ठरणारी अत्यावश्यक प्रेरणाही दिली. शुक्ला यांनी देशवासीयांशी थेट संवाद साधत संपूर्ण प्रवासाचा अनुभव सांगितला, तो 1.4 अब्ज भारतीयांसाठी सरत्या वर्षातील अभिमानाचा क्षण ठरला.
सरत्या वर्षी क्रीडाक्षेत्रातही भारताने विशेष कामगिरी नोंदवली. मुख्य म्हणजे 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात चार विकेट्सने विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी जकली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या सुसंगत आणि आक्रमक खेळाचे दर्शन देशवासियांना सुखावून गेले. आनंदाचा हा भर असतानाच दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेटपटूंनी सुवर्णाक्षरे लिहिली. भारतीय महिला संघाने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवर विजयी मोहर उमटवत जल्लोश साजरा केला आणि हा भारताच्या महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा पार झाला. स्वाभाविकच देशभरात महिला क्रीडांगणाला नवीन ऊर्जा देणारा तो क्षण कधीच विसरला जाण्याजोगा नाही. थोडक्यात, या दोन्ही घटनांमुळे 2025 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी प्रगतीचे, आत्मविश्वासाचे आणि राष्ट्रीय गौरवाचे ठरले. या दोन्ही संघांनी जगात आपले स्थान बळकट केले. वर्षाच्या अखेरीस जगविख्यात फुटबॉलपटू लोयोनेल मेस्सीने दिलेली भारतभेट, यात भारतातील खेळाडूंमध्ये फुटबॉलप्रती रुची आणि क्षमता वाढवण्यासाठी आखलेल्या योजनाला दिलेले योगदान आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यामुळे निराश प्रेक्षकांनी घातलेला गोंधळ हे सगळेच प्रकार गाजले. मात्र या सगळ्यातून येत्या वर्षात देश क्रीडाविश्वात चांगली कामगिरी करेल, हा विश्वास दुणावण्याचे काम निश्चितच झाले आहे.
आर्थिक क्षेत्रातील घडामोडींकडे नजर टाकता भारताने राखलेला स्थिर विकास दर, डिजिटल व्यवहार आणि स्टार्ट-अप उद्योगाला मिळणारी बळकटी, महामार्ग-रेल्वे- स्मार्ट सिटी आणि हरित ऊर्जा यामध्ये वाढती गुंतवणूक हे मुद्दे नजरेत भरणारे असून देशाचा आधारभूत ढाचा मजबूत होत असल्याचे ते निदर्शक म्हणावे लागेल. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली असल्याचे 2025 ने दाखवून दिले आहे. सरत्या वर्षी 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे यांनी काशी (वाराणसी) येथे दंडक्रम पारायण नामक अत्यंत कठीण वैदिक जपाचे इतिहासात जवळपास 200 वर्षांनी पुनरुत्थान केले. दंडक्रम पारायण ही शास्त्रीय वैदिक मंत्र जपेची एक अत्यंत अवघड पद्धत असून त्यात शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचा अविरत जप करणे अपेक्षित असते. तसेच योग्य स्वर, छंद आणि उच्चार या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन आवश्यक असते.
सरत्या वर्षात गुजरातमधील भीषण विमान दुर्घटना अनेकांना प्रचंड धक्का देऊन गेली. पहलगामवरील भ्याड हल्ला मस्तकाची शीर उठवून गेला. त्यानंतरचे तणावपूर्ण संबंध, हल्ले आणि युद्धस्थितीचे सरते वर्ष साक्षीदार राहिले. याच वर्षाने अमेरिकेचे बदलते आयात शुल्क धोरण दाखवले तर छेडलेल्या जागतिक व्यापारयुद्धाच्या झळीचे भयही दाखवले. हगवणे प्रकरणाने हुंडाबळीचे आव्हान आजही कायम असल्याचे विखारी सत्य समोर आणले तर गरिबीशी सामना करताना पोटच्या मुलांना विकल्याची, कर्ज चुकवण्यासाठी किडनी विकल्याची प्रकरणे समोर आणली. सरत्या वर्र्षी मनोजकुमार, पंकज धीर, धर्मेंद्र, संध्या शांताराम, असरानी, सतीश शहा, शेफाली जरीवाला, सुलक्षणा पंडित, प्रख्यात लेखक डॉ. भैरप्पा ही नावे काळाच्या पडद्याआड गेली. त्या सर्वांचे स्मरण कायमच राहील.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *