फिडे वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कास्यपदक

दोहा (कतार) : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याने फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकत जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा उंचावला आहे. याच स्पर्धास्थळी काही दिवसांपूर्वी झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्येही अर्जुनने कास्य पदक पटकावले होते. त्यामुळे एकाच जागतिक स्पर्धेत रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारांत पदक जिंकण्याचा मान त्याला मिळाला आहे.

दोहा येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील अव्वल बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. ब्लिट्झ प्रकारात ३ मिनिटे अधिक प्रत्येक चालीला २ सेकंदांची वाढ अशा वेळनियंत्रणात सामने खेळवण्यात आले. अत्यंत वेगवान आणि अचूक निर्णयक्षमतेची कसोटी असलेल्या या स्पर्धेत अर्जुनने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला.

स्विस पद्धतीने झालेल्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये अर्जुनने सातत्यपूर्ण कामगिरी करत अव्वल खेळाडूंना मागे टाकले आणि बाद फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला असला, तरी एकूण गुणसंख्येच्या आधारे अर्जुनच्या नावावर ब्रॉन्झ पदकाची मोहोर उमटली.

याआधी रॅपिड चेस स्पर्धेत मिळवलेल्या ब्रॉन्झ पदकामुळे अर्जुन आधीच चर्चेत होता. सलग दोन जागतिक स्पर्धांत पदक मिळवणे ही भारतीय बुद्धिबळासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे. अर्जुनची ही कामगिरी युवा भारतीय बुद्धिबळपटूंना नवी प्रेरणा देणारी ठरली आहे.

अर्जुन एरिगैसीच्या या यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी एरिगसीचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *