
मुंबई : उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची बुलंद तोफ असणाऱ्या खासदार संजय राऊत यांना बुधवारी एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराबाहेरील धुळीने माखलेल्या कारवर राऊत यांना आजची रात्र शेवटची असेल, बॉम्बने उडवून देणार अशी धमकी लिहीली होती. हा प्रकार लक्षात येताच ताबोडतोब पोलिसांनी तपास सुरु केला. बॉम्बशोधक पथकान लगेच घराची तपासणी केली.
या प्रकरणी कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यंत्रणा धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
खासदार संजय राऊत हे कुटुंबीयांसह कांजुरमार्ग येथील भांडुप परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका मोटारगाडीवर अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याचे उघड झाले आहे. या संदेशात बुधवारी त्यांना ठार मारण्याची तसेच बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
सदर मोटारगाडी गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर उभी असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे. याच धुळीवरून धमकीचा मजकूर लिहिण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या संदेशात “बुधवारची रात्र संजय राऊत यांची शेवटची रात्र असेल” अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हा मजकूर लिहीणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
