भांडूप बस अपघातप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्तांनाही जबाबदार धरा – प्रभाकर नारकर

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या अपघाताला महापालिकाही जबाबदार असून संबंधित रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याबद्दल एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी जनता दल सेक्युलर मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली आहे

सोमवारी सायंकाळी भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम बाजूला बेस्ट बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे चौघा मुंबईकरांचा बळी गेला असून दहा पादचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी संबंधित बसच्या चालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. परंतु, या अपघाताला केवळ बस चालकाला जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो भांडुप स्थानकांकडून लालबहादूर शास्त्री मार्गाकडे जाणारा रस्ता फेरीवाल्यांनी अडवलेला असतो. विशेषकरून रेल्वे स्थानकाकडे येणारी बाजू स्टॉल आणि फेरीवाले यांनी अडवलेली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या रस्त्यावर माणसांना चालायला जागा नाही; त्या रस्त्यावर बस चालवायला लावणे हाच मोठा गुन्हा होता, असे जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार सदानंद तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दिनेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. असे असताना भांडूप पश्चिम बाजूच्या या रस्त्यावर फेरीवाले कसे बसत होते, असा सवाल करून फेरीवाल्यांवर कारवाई न करणारे महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त व त्यांचे संबंधित सहकारीही या अपघाताला जबाबदार आहेत. त्यामुळे बस चालकावर कारवाई करतानाच एस वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांवरही कारवाई व्हायला हवी. त्यासाठी त्यांना निलंबित करून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी जनता दल (से) मुंबई पक्ष तसेच मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या वतीने या सर्वांनी केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना रेल्वे स्थानकापासून किमान तीनशे मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. अन्यथा भांडूप स्थानकाबाहेर झालेल्या अपघातासारख्या घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील, आणि मुंबईकरांचे प्राण जात राहतील, असा इशारा या सर्वांनी दिला आहे.

चौकट

२५ लाखाची मदत मिळावी

भांडुपच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार व बेस्टकडून अनुक्रमे पाच लाख व दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आणि एक प्रकारे कुटुंबीयांची थट्टा करणारी आहे. त्यामुळे किमान २५ लाख रुपयांचे मदत या कुटुंबांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *