घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या खऱ्या व्यथा कधीच समजणार नाहीत – एकनाथ शिंदे
अनिल ठाणेकर
मुंबई, बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, अशी ओरड काहीजण करत आहेत मात्र घरात बसून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबई आणि मुंबईकरांच्या व्यथा कधीच समजणार नाहीत, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. चांदिवली येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची भव्य प्रचारसभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईतील कुर्ला, विक्रोळी, भांडूप, चांदिवली कलिना येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी भव्य रोड शो आणि बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी जागोजागी मुंबईकरांनी आणि लाडक्या भाऊ बहिणींनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. जागोजागी महिलांनी त्यांना ओवाळून आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे आपल्या प्रभागात स्वागत केले. या रोड शो ला आबालवृद्धांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.यानंतर पार पडलेल्या सभेत बोलताना त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर उतरून, कामातून उत्तर देणारे आम्ही आहोत, तर केवळ भाषणांपुरते मर्यादित राहणारे मुंबईकरांचे खरे हितचिंतक असू शकत नाहीत, असा थेट टोला लगावला. “मुंबई म्हणजे फक्त एसी रूममधून भाषण करणं नाही. मुंबई म्हणजे पावसात रस्त्यावर उतरून नालेसफाई पाहणं, पूरग्रस्त भागात लोकांच्या भेटीला जाणं आणि अडचणीत असलेल्या मुंबईकरांच्या पाठीशी उभं राहणं,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या कार्यपद्धतीवर भर दिला. मुख्यमंत्री असताना आपण केवळ फाईलींवर सही करत बसलो नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन निर्णय घेतले, असेही ते म्हणाले.मुंबईच्या विकासाला जाणूनबुजून ब्रेक लावणाऱ्यांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, मेट्रो, कारशेड, रस्ते काँक्रीटीकरण, पुनर्विकास अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना ज्यांनी स्थगिती दिली, तेच आज विकासाचे प्रश्न विचारत आहेत. आम्ही सत्तेत आल्यानंतर थांबलेली कामे पुन्हा सुरू केली. मुंबईतील सिमेंटचे रस्ते, मेट्रो प्रकल्प, कारशेड, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मोठी उद्याने आणि सेंट्रल पार्क, बोर्ड टॅक्सी बीकेसी मध्ये भुयारी पार्किंगची कामे ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्षात सुरू आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, स्वतः आलिशान बंगल्यात राहून झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्विकासाला विरोध करणे हा दुटप्पीपणा आहे. “प्रत्येक मुंबईकराला हक्काचे, सुरक्षित आणि मोठे घर मिळाले पाहिजे. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे आमचे स्वप्न नाही, तर आमचे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी ओसी देण्याचे निर्णय, टीडीआरची मुभा आणि रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा उल्लेख केला.मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, अशी भीती पसरवणाऱ्यांवरही शिंदे यांनी निशाणा साधला. “जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. अशा अफवा पसरवणारे मुंबईकरांचे खरे हितचिंतक नाहीत,” असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले. मुंबई ही सर्व मराठी माणसांची आहे आणि तशीच राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. गरिबी, कष्ट आणि सामान्य कुटुंबांचे दुःख जवळून पाहिल्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आली. सरकार हे लोकांच्या सेवेसाठी असते, लोकांच्या पैशावर ऐषआराम करण्यासाठी नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेल्या मदतीचा दाखला दिला.सभेच्या शेवटी शिंदे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत जनता कामाच्या जोरावरच निकाल देणार आहे. “आम्ही मालक नाही, सेवक आहोत. मुंबईकरच खरे मालक आहेत. काम करणाऱ्यांनाच जनता पुन्हा संधी देईल,” असे सांगत त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर,  आमदार अशोक पाटील आणि माजी महापौर दत्ता दळवी, अशोक पांगारे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *