रमेश औताडे
नवी मुंबई : भाजपा नेहमी विकासाचे बोलते असे ठासून सांगत लवकरच मुंबईतील तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या प्रचारात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. राज ठाकरेंनी शिवाजीपार्कवरील भाषणात मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार आज फडणवीसांनी घेतला.
पनवेलमध्ये मोठी वाहतूक कोंडी असून दिल्ली-वडोदरा हायवेमुळे नवी मुंबई अन् पनवेलमधील वाहतूक कोंडी सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथील कळंबोली जंक्शन सुधारणार आहे, आपण तुर्भे टनल करतोय, विमानतळ कनेक्टिविटीसाठी दोन वेगळे मार्ग उभारणार आहोत. सिडको ने ५९ किलो मीटर मेट्रोचे जाळे हाती घेतले आहे. त्यातून, नवी मुंबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कल्याण-डोंबिवली शहरही भविष्यात मेट्रोने जोडणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
तसेच, राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
अटलसेतूचंकाम गतीने मार्गी लावलं
सन 1990 साली नवी मुंबई विमानतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. पण, प्रत्यक्षात अत्यंत संथ गतीने काम चालू होते. भाजप सरकार केंद्रात, राज्यात आल्यावर लगेच सर्व परवानग्या घेऊन विमानतळाच्या कामाला सुरवात झाली. तर, अटल सेतूचा प्लान जे. आर. टाटा यांनी १९६२ मध्ये तयार केला होता. पण, त्यांच्या प्लॅनला सरकारने प्रतिसाद दिला नव्हता. अनेक अडचणी होत्या, परवानग्या असंख्य होत्या. वॅार रुममध्ये हे काम हाती घेतले. प्रचंड पाठपुरावा केल्याने लवकर प्रोजेक्ट मार्गी लागले, असेही फडणवीसांनी सांगितले.
photo caption
नवी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना कॅबिनेट मंत्रि गणेश नाईक
