ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन
यूपीएससी परीक्षार्थींना डीएएफ फॉर्म व सेवा प्राधान्याबाबत मार्गदर्शन
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे “DAF Form Filling & Preference of Services” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार नुकतेच विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी व सध्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले सनदी अधिकारी डॉ. नितीन जावळे (IAS – २००३) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या विशेष व्याख्यानात ठाणे व मुंबई शहरातील यूपीएससी परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात डॉ. नितीन जावळे यांनी UPSC DAF फॉर्म म्हणजे काय, तो कसा भरावा, फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल करता येतात का, सेवा प्राधान्य (Service Preference) कसे द्यावे, त्यात बदल कधी व कसा शक्य आहे, याबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन केले.
याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संयम, प्रामाणिकपणा, सातत्य व आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे उपआयुक्त सचिन सांगळे तसेच संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेतील अनुभवातून मार्गदर्शन मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. संस्थेचे गिरीश झेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
