निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ती निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याची काटेकोर तयारी करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून, प्रभाग क्रमांक १ ते २८ व ३० ते ३३ मध्ये चार, तर प्रभाग क्रमांक २9 मध्ये तीन जागांसाठी मतदान होणार आहे. महापालिका क्षेत्रात एकूण १६,४9,८६9 मतदार असून त्यामध्ये ८,६३,८७८ पुरुष, ७,८५,८३० महिला व १५9 इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. ३३ प्रभागांमध्ये एकूण २,०१३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त असणार आहे.
निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सर्व मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून ती स्ट्राँग रूममध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रे, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रे व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
महिला सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक विभागात महिला सखी (पिंक) मतदान केंद्र तसेच पर्यावरणपूरक आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
१३ जानेवारी २०२६ रोजी प्रचार संपुष्टात आला असून त्यानंतर सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यास मनाई आहे. नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ठाणेकरांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
