डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर शिंदेंच्या सेनेचा कोयत्याने हल्ला
नवीमुंबई भाजपाकडून शिंदेंच्या कार्यकर्त्याला मारहाण
उल्हासनगरमध्ये ५० लाखांची कॅश पकडली
मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महागनरपालिकांसाठीच्या निवडणूकीचा प्रचार संपला असून निवडणूकीतील राड्याला मात्र सुरूवात झाली आहे. पुढील दोन दिवस सर्वत्र लक्ष्मीदर्शनाकडे मतदारांचे लक्ष असेल असेच चित्र दिसत आहे. उल्हासनगरमध्ये आज रिक्षातून नेण्यात येणारी पन्नास लाखांची कॅश जप्त करण्यात आलीय तर
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर प्रभागातील भगतवाडी भागात भाजपच्या अधिकृत उमेदवार आर्या ओमनाथ नाटेकर यांच्या पतीवर विरोधी एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी कोयत्याने हल्ला केलाय. नवीमुंबईत तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलीय. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष राज्यात महायुतीम्हणून एकत्रित सत्तेत आहेत.
डोंबिवलीत आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी प्रभागात फिरणाऱ्या भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर यांच्यावर प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार नितीन मट्या पाटील, रवी मट्या पाटील आणि इतर आठहून अधिक जणांनी सोमवारी रात्री हल्ला करून ओमनाथ यांना गंभीर जखमी केले आहे, असा आरोप करत भाजपने मंगळवारी या दोन्ही पाटील बंधूंच्या अटकेसाठी शहरात मूक मोर्चा काढला. या मोर्चात कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष नंदकिशोर परब, उमेदवार आर्या नाटेकर, नंदू जोशी, पप्पू म्हात्रे, उमेदवार अलका म्हात्रे, नाटेकर यांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिंदे गटाच्या उमेदवारासह इतर कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करत पाच शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे. तर शिंदेसेनेचे उमेदवार नितीन पाटील हेही जखमी झाले असून त्यांचावर पोलिसांच्या नजरकैदेत उपचार सुरु असून इतर अरीपोचा शोध पोलीस घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या राड्यात भाजपचे २ तर शिवसेनेचे २ पदाधिकारी जखमी झाले आहे.
नवीमुंबईतही हाणामारी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहेत. शिंदे गटाचा कार्यकर्ता कोपरखैरणे गावात मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता हातात सापडल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. दोन्ही बाजूंनी भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या कार्यकर्त्याला फटकावत होते. त्याच्या थोबाडीत मारण्यात आल्या. या कार्यकर्त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याला गळा आवळला. मात्र, शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता कसाबसा निसटून भाजपच्या फौजेशी एकटाच लढत होता. मला मारु नका, असे तो वारंवार बजावत होता.
मुंबईतही वादाच्या ठिणग्या
मुंबईतील प्रभाग क्रमांक १२४ मध्ये मध्यरात्री मोठा राडा झाला. या राड्यात शिवसेना ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सकीना शेख यांच्या कार्यकर्त्यांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हारून खान यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
उल्हासनगरमध्ये ५० लाख जप्त
दरम्यान, उल्हासनगर येथील सुभाष टेकडी चौकात अपक्ष उमदेवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैशांच्या वाटपासाठी निघालेली रिक्षा सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडली, या रिक्षात ही पैशांची बॅग होती. त्यामुळे, रिक्षा चालक आणि रोकड असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
उल्हासनगर मनपा निवडणुकीत भाजपच्या प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयातून रक्कम बाहेर आल्याचा आरोप नरेश गायकवाड यांनी केला आहे.
बॅगेतील नोटा मोजण्यासाठी उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोटा मोजायचे मशीन आणण्यात आले. पोलिसांनी बंद रुममध्ये पंचनामा करत नोटा मोजून संबधिंताविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
