डहाणूच्या शाळेत पोषण आहाराला फाटा शिक्षकाने केले थेट तांदळाचे वाटप

प्रमुख शिक्षक शेलार यांची चौकशी होणार
शालेय व्यवस्थापन समिती आणि वरिष्ठही अंधारात
योगेश चांदेकर
पालघरः जिल्हा परिषद  शाळातील मुलांना शालेय पोषण आहार शिजवून द्यायचा नियम असताना तो नियम धाब्यावर बसवून डहाणू तालुक्यातील मल्याण केंद्रातील वडकून जिल्हा परिषद शाळेतील प्रमुख शिक्षक बाबूराव सीताराम शेलार यांनी  नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा कोरडा तांदूळ परस्पर वाटून टाकला. हा प्रकार गंभीर असून आता त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. गटशिक्षणअधिकारी संजय वाघ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे मान्य केले आहे.

शाळेचे मुख्य शिक्षक बाबूराव सीताराम शेलार हे पूर्वीपासूनच वादग्रस्त असून, त्यांच्या अनेक करामती पंचायत समितीपर्यंत पोहोचल्या आहेत. पूर्वी एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण प्रकरण. त्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या डोक्याला टाके पडले होते. हे प्रकरण अजूनही पोलिस दप्तरी आहे. असे असताना आता शेलार यांनी हा दुसरा गंभीर प्रकार केला आहे.
शालेय पोषण आहार हा शाळेत शिजवून दिला जातो. विद्यार्थ्यांना परस्पर धान्य वाटपाची परवानगी कोणालाच नसते. शाळांना एप्रिल, मे महिन्यात सुट्टी लागण्याच्या काळात जर तांदूळ शिल्लक असेल, तर तो शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव आणि पंचायत समितीच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थ्यांना वाटप करता येऊ शकतो; परंतु एरव्ही मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरडा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटला जाता येत नाही. त्याबद्दल शासनाचे नियम अतिशय कठोर आहेत. असे असताना नोव्हेंबरमध्ये शेलार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन ते चार किलो तांदूळ वाटून टाकला.
या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर विस्तार अधिकारी राजुदास  जाधव यांनी शाळेत जाऊन तपासणी केली; परंतु ही तपासणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांदूळ साठयाची चौकशी करायला गेलो होतो, असे ते एकीकडे सांगतात, तर विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपाची तक्रार आपल्याकडे आली नाही, असे ते म्हणतात. विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन ते चार  किलो तांदूळ वाटूनही कागदोपत्री तांदळाची नोंद कमी असल्याचे दिसते आणि प्रत्यक्षात मात्र साठा जास्त तांदूळ असल्याचे जाधव सांगतात.
शाळा व्यवस्थापन समितीबाबत साशंकता?
शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता विद्यार्थ्यांना तांदूळ परस्पर कसा दिला किंवा शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आहे, की नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात असून हे प्रश्न शेलार यांची कोंडी करणारे आहेत. विस्तार अधिकारी राजुदास जाधव यांची याबाबतची भूमिका ही संशय निर्माण करणारी आहे.  हा प्रकार अतिशय गंभीर असून यावर आता पंचायत समिती काय कारवाई करते आणि विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून न देता कोरडा शिधा कसा दिला, याबाबत पंचायत समिती काय करते याकडे आता नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
प्रकरण गंभीर, चौकशी करणार
शालेय शिक्षण समितीची परवानगी न घेता किंवा वरिष्ठ कार्यालयाला पूर्वसूचना न देता जर विद्यार्थ्यांना कोरडा शिधा दिला असेल, तर हा प्रकार गंभीर असून याप्रकरणी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवू.
– संजय वाघ, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, डहाणू

चौकट

शेलार यांचे मौन
हा प्रकार गंभीर असून याबाबत ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा शेलार यांच्याशी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तर जाधव यांनी आपण शाळेची तपासणी केली आहे, त्याची माहिती गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिली आहे, असे सांगितले. कागदोपत्री तांदूळ कमी असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात तांदळाचा साठा जास्त आहे, हे त्यांनी मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *