पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान
भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर
योगेश चांदेकर
पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला सन्मान वाटत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पालघर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. ९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांच्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख नाळ आणि आत्मा आहेत. चार पिढ्या धिंडा कुटुंबांने तारपा वाजण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
ऐंशी वर्षे तारपा वाजनात
भिकल्या धिंडा यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपा वाजवण्याचा छंद लागला. त्यांच्या घरात तारपा वाजवणारी ही चौथी पिढी आहे, असे ते सांगतात. गुराढोरा सोबतच रानावनात भटकताना तारपा वाजवण्याचा छंद मला लागला. तो छंद आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो, केवळ मीच तारपा वाजवून थांबत नाही, तर अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवले आहे. आजच्या मोबाईलच्या युगात तरुण आपल्या संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत, हे खरे असले, तरी मी मात्र तरुणांना आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, असे ते विनयाने सांगतात.
दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे वैशिष्टय
भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी आहेत. ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असले, तरी त्यांनी आपली संस्कृती प्राणपणाने जोपासली आहे. दीडशे वर्षाची तारपा वादाची परंपरा जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते; मात्र भिकल्या धिंडा यांची याबाबतही एक विशेष ओळख आहे. ते दहा फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात .इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसाची ताकद, श्वासावरचे नियंत्रण आणि कलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून सर्वच जण थक्क होतात. हातात काठी आणि सोबतीला तारपा वाद्य घेऊन भिकल्या धिंडा हे वयाच्या दहाव्या वर्षापासून तास न तास सराव करायचे. सुमारे ऐंशी वर्ष ते तारपा वाजवत असून त्यांची सुरावरील पकड आजही तितकीच घट्ट आहे.
शरीर थकले, तरी उत्साह कायम
तारपा हेच आपले दैवत आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे; मात्र पद्मश्री हा या सर्व सन्मानात मोठा सन्मान असून आता ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीने ती जपली पाहिजे असे भावनिक आवाहन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी केले. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात आपले नाव आल्याचे त्यांना दिल्लीवरून कळवले, तेव्हा त्यांना हा आदिवासी संस्कृतीचा सन्मान आहे आपण निमित्त मात्र आहोत अशी विनयाची भावना ते व्यक्त करतात. कुटुंबात २२ माणसे आहेत. आठ गुंठे जमीन आहे. दुसरा व्यवसाय नाही. नोकरी नाही, तरी त्यांची जगण्याची धडपड अजून थांबलेली नाही. त्याबाबत ते कुणालाही दोष देत नाहीत. लहानशा झोपडीत आजही ते राहतात.
पुरस्कारातून बांधले घर
महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या काही रकमेतून त्यांनी हे घर बांधले आहे. त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले असले, तरी एकतारा गुरुकुल तर्फे देण्यात आलेली तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून दिला गेलेला संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, पालघर भूषण पुरस्कार, पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने या सन्मानांचाच आणखी सन्मान झाला आहे.
कोट
‘आदिवासी कलेची केंद्र सरकारने दखल घेतली. पद्मश्री जाहीर झाला. कलेनेच मला मोठे केले. माझी जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. ही कला, संस्कृती टिकली पाहिजे.
भिकल्या धिंडा, पद्मश्री सन्मान प्राप्त कलाकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *