संबंधांचा नवा टप्पा
17 वर्षांनंतर ब्रिटनमधून परतल्यानंतर खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रहमान यांचे ढाक्यात जंगी स्वागत झाले. आता तेच पक्षाला ऊर्जितावस्थेत नेतील, हा विश्वास सार्थ ठरला आहे. बांगलादेशच्या जनतेने दिलेला निकाल केवळ बांगलादेशी राजकारणासाठीच नाही, तर भारतासाठीही महत्त्वाचा आहे. भारत ‌‘बीएनपी‌’च्या विजयाला संकट किंवा उत्सवाचे कारण मानणार नाही. एका प्रकारे ही भारतासाठी एक परीक्षा असेल. भारतासाठी, सुरक्षा सहकार्य, परराष्ट्र धोरण संतुलन आणि आर्थिक भागीदारी हे बांगलादेशच्या नवीन सरकारशी त्याचे संबंध कोणत्या दिशेने जातात हे ठरवेल. गेल्या काही दिवसांमधील ‌‘बीएनपी‌’ची भारताबाबत बदललेली भूमिका आणि प्रतिसाद लक्षात घेऊन भारत बांगलादेशशी सहकार्य वाढवेल. भारत आपल्या पर्यायांचा विचार करेल आणि व्यावहारिक पद्धतीने पुढील निर्णय घेईल. भारताने नेहमीच जनादेशाचा आदर केला. या वेळीही तेच केले आहे. तारिक यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‌‘एक्स‌’वर लिहिले, की बांगलादेशमधील संसदीय निवडणुकीत ‌‘बीएनपी‌’ला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बांगलादेशमधील जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवतो. भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची सामान्य विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. मोदी यांची ही भाषा भारताची बांगलादेशप्रती असलेली भूमिका विषद करते.
भारताला ‌‘जमात-ए-इस्लामी‌’ या पाकिस्तानधार्जिण्या पक्षाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल चिंता होती. हा पक्ष पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‌‘आयएसआय‌’च्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. या निवडणुकीमध्ये जमात पक्ष सत्ता जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार होता. त्याने 11 पक्षांशी युतीही केली होती. ‌‘बीएनपी‌’ आणि भारत यांच्यातील संबंध बरेच अस्वस्थतेचे होते, तरी सध्याच्या परिस्थितीत भारताने त्याकडे तुलनेने मध्यम आणि लोकशाहीवादी पर्याय म्हणून पाहण्यास सुरुवात केली. या परिस्थितीत भारताकडे मर्यादित पर्याय होते आणि त्यांना दोन कठीण पर्यायांमधून कमीत कमी हानिकारक मार्ग निवडावा लागला. दुसरीकडे, पाकिस्तानची विचारसरणी पूर्णपणे उलट आहे. त्यांनी अनेकदा भारतविरोधी पर्यायाचे समर्थन केले आहे. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत बांगलादेशने पाकिस्तानपासून अंतर राखले होते; परंतु त्यांच्या पदच्युतीनंतर युनूस यांच्या नेतृत्वाखाली धोरणात अचानक बदल दिसून आला. त्याद्वारे पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता, तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भारतापासून स्वतःला दूर ठेवण्यावर भर देण्यात आला होता. ‌‘जमात-ए-तैयबा‌’ सत्तेत आली, तर ही जवळीक आणखी वाढेल अशी भीती होती. सत्तेत आल्यानंतर ‌‘बीएनपी‌’ चीन आणि पाकिस्तानशी किती जवळीक वाढवते याकडे भारताचे लक्ष आहे. ‌‘जमात‌’सारख्या कट्टरपंथी पक्षाच्या आव्हानाला तोंड देत असताना ‌‘बीएनपी‌’चा विजय बांगलादेशी हिंदूंना काही प्रमाणात दिलासा देणारा ठरेल.
‌‘बीएनपी‌’ने ‌‘जमात‌’च्या आधारे निवडणुका लढवल्या नाहीत. इक्बाल मंचचे नेते उस्मान हदी यांच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये झालेल्या अलिकडच्या हिंसाचारावर ‌‘बीएनपी‌’ने टीका केली आहे. त्यात एका हिंदू तरुणाची लिंचिंग आणि हत्या यांचा समावेश आहे. ‌‘जमात‌’कडून अशा प्रकारची कृती अपेक्षित नव्हती. बांगलादेशी हिंदूंना निश्चितच एक आशा आहे, की नवीन सरकारच्या काळात त्यांची परिस्थिती सुधारेल. बांगलादेशमधील ‌‘जमात-ए-इस्लामी‌’ला थेट अमेरिकेचा पाठिंबा होता. तिला दारुण पराभव पत्करावा लागला. ‌‘जमात‌’ला विद्यार्थी नेत्यांचा पाठिंबा होता आणि मोहम्मद युनूस यांच्या यंत्रणेचा पूर्ण पाठिंबा होता, तरीही निवडणुकीत कट्टरपंथी पक्षाला 50 जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ‌‘जमात‌’चा पराभव आणि ‌‘बीएनपी‌’चा विजय दर्शवतो की देशाने कट्टरपंथी विचारसरणी नाकारली आहे आणि लोक मुख्य प्रवाहातील पक्षाला देशाचे भविष्य मानत आहेत. याचा अर्थ असा, की शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. त्यामुळे भविष्यात अवामी लीग मुख्य प्रवाहात परत येऊ शकते. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर ‌‘जमात-ए-इस्लामी‌’ने जोरदार संघर्ष केला. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या अनेक प्रमुख ‌‘जमात‌’ नेत्यांना मोहम्मद युनूस यांनी तुरुंगातून मुक्त केले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी उघडपणे ‌‘जमात‌’ नेत्यांची भेट घेतली आणि ‌‘मुस्लिम उम्मा‌’ने परदेशातून ‌‘जमात‌’ला निधीही पुरवला, तरीही ‌‘जमात‌’चा पराभव झाला. ‌‘अवामी लीग‌’ला निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत बीएनपी हा प्रवाहातील एकमेव मुख्य पक्ष होता.
‌‘बीएनपी‌’चा प्रचंड विजय दर्शवतो, की लोकांचा मुख्य प्रवाहातील पक्षावर विश्वास आहे. देशाचा मध्यमार्गी विचारसरणीवर विश्वास आहे. बांगलादेशच्या महिला मतदारांनी उघडपणे ‌‘जमात-ए-इस्लामी‌’च्या विरोधात मतदान केले आहे. बांगलादेश निवडणुकीत पाश्चात्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था गट खूप सक्रिय होते. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता, मुहम्मद युनूस आता अप्रासंगिक बनले आहेत. त्यांच्या ‌‘जुलै चार्टर जनमत‌’ला किती पाठिंबा मिळाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी युनूस आणि ‌‘जमात‌’वर अमेरिका-ब्रिटन युतीने दिलेल्या पूर्ण पाठिंब्याचा फारसा परिणाम झाला नाही. आता भारताने तारिक रहमानशी प्राथमिक चर्चा केली आहे. त्यांच्या आई बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ढाका येथे भेट दिली आणि पंतप्रधान मोदींनीही खालिदा झिया यांच्याबद्दल ट्विट केले. यामुळे भारताचे बांगलादेश सरकारशी स्थिर संबंध निर्माण होऊ शकतात. किमान कामकाजाचे संबंध प्रस्थापित होतील. शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष निवडणुकीतून बाहेर पडला होता. त्यामुळे ही लढत थेट ‌‘जमात-ए-इस्लामी‌’ आणि ‌‘बीएनपी‌’ यांच्यात झाली. ‌‘जमात‌’ने हुशारीने प्रचार केला आणि स्वतःला एकसंघ, सुधारणावादी पक्ष म्हणून प्रस्तुत केले. तथापि, ते बांगलादेशच्या एका महत्त्वपूर्ण भागाला आकर्षित करण्यात अपयशी ठरले. तरी त्यांनी लक्षणीय जागा जिंकल्या, हे महत्वाचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *