माझे रत्नागिरी येथील ९६ वर्षाचे वयोमान असलेले ज्येष्ठ मित्र बाळ पाटणकर यांच्याशी आज सकाळीच बोलणे झाले. आवाज अत्यंत खणखणीत आणि आत्मियतेचे बोलणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ठ्य आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तसंस्थेचे कोकणचे विभागीय प्रतिनिधीम्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. रत्नागिरी येथे दैनिक रत्नभूमी या वृत्तपत्रात मी पत्रकारितेला प्रारंभ करीत असताना सदर दैनिकाचे संपादक स्व. भि. रा. पालांडे-देशमुख यांच्यामुळे माझी बाळ पाटणकर यांच्याशी ओळख झाली. अत्यंत स्पष्ट, परखड बोलणारा आणि कडव्या समाजवादी विचाराचा असलेला पाटणकर हा माणूस मला सुरूवातीपासूनच भावला होता.
जन्माने मुस्लीम पण आपल्या “सर्व धर्म समभाव” या तत्त्वाशी एकनिष्ठ असलेल्या पाटणकर यांनी ‘दै. रत्नागिरी टाइम्स’ या वृत्पत्रातून जवळपास २५ वर्षे दर शुक्रवारी ‘इस्लामी जगत’ हे अत्यंत लोकप्रिय वैचारिक सदर लिहिले. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. त्या सदरातील निवडक १०२ लेखांचे “इस्लामी जगत” याच नावाने पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते मी अधून मधून आवर्जून वाचत असतो. बाळासाहेबांना शतकोत्तर आयुष्यमान लाभो अशी सदिच्छा व्यक्त करीत असतानाच त्यांच्या पुस्तकातील “सावरकर हे मुस्लीमविरोधी व जातीलवादी नव्हतेच!“ हा लेख स्वातंत्र्यवीर सावरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज लोकांसमोर आणावा असे मला वाटले. या पुस्तकाचे संपादन बाळासाहेबांची पत्नी श्रीमती हुस्नआरा बाळ पाटणकर यांनी केले आहे.
भाई वैद्य यांची प्रस्तावना
या पुस्तकाला दिवंगत समाजवादी नेते भाई वैद्य यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात भाई लिहितात – “मुंबईला असताना जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर कामगार संघटनेत काम करीत असताना बाळासाहेबांचा एस. एम. जोशी, बॅ. नाथ पै, मधु लिमये, मधु दंडवते यांसारख्या अनेक दिग्गज समाजवादी नेत्यांबरोबर संबंध आला आणि ते निष्ठावान समाजवादी बनले. (अखंड रत्नागिरी) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना बेदखल शेतकऱ्यांच्या लढ्यातही त्यांनी तुरुंगवास पत्करला. आज पडत्या काळातही ते शंभर टक्के समाजवादी असून मध्यंतरी ते सोशालिस्ट पार्टी (इंडिया) चे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्षही होते. त्यातील निवडक १०२ लेखांचे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट फार मोलाची आहे.“
मुसलमान एखाद्या विषयावर कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि नेमकी त्याच्यावर पश्चात्तापाची पाळी येते. या देशातल्या बहुसंख्याकांसमोर मुसलमानांचे बाहुले ठेवून राजकारण करणाऱ्यांना हे पक्के माहीत असल्यामुळे ते सतत काही ना काही कारण पुढे करून मुसलमानांना ओढत असतात. मुसलमानांनी हे सतत ध्यानात ठेवून संघर्षापासून अलिप्त राहायला हवे. जीवनात यशस्वी होण्यासाठी इस्लामची समतेची तत्त्वेच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहेत.
परंतु वर्तमान काळात मुसलमानांनी परिस्थितीचे नीट आकलन केले नाही, ना इस्लामच्या इतिहासापासूनही धडा घेतला नाही. मुसलमानांचे नादान पुढारी चुकीचा इतिहास सांगून सदैव भावनांशी खेळत राहिले. या उलट्या दिशेने जाणाऱ्या मार्गदर्शनाने मुसलमानांची विचार पध्दतीच बिथरून गेली आहे. तसे पाहिले तर देशात सर्वत्रच विचार करण्याच्या पध्दतीत फार मोठा बदल झालेला दिसतो. आज आमच्यापाशी भारत आहे, भारतीय आहेत, परंतु भारतीयता नाही.
इस्लामच्या नावाखाली उगाचच सतत मुसलमानांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचे रडगाणे रडत राहणे बरोबर नाही. कणे टाकून कोंबडे झुंजवत राहण्यासारखे काहींना हिंदू-मुसलमानांना सतत झुंजवत ठेवून आपली पोळी भाजावीशी वाटले. सर्वसामान्यांना तसे मुळीच वाटत नाही. दोन्ही समाजातील सर्वसामान्य सर्वांशी मिळून मिसळून राहणारे आहेत. येथील कष्टकरी जनतेचे प्रश्न सारखेच आहेत. मुसलमानांनी हे समजून घ्यायला हवे.
ते कौतुक हिंदूने केले
कसबा हायस्कूलचे प्रिन्सिपॉल श्री. गुलाम कोंडकरी यांच्या मुलानेस्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केले. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून एक चेक पाठवला तो कुणी मुसलमानाने नव्हे, तर रत्नागिरी जिल्हयातील एक हिंदू श्री. भावे यांनी. पाकिस्तानात चालू असलेला गोंधळ इथले मुसलमान समजत नाहीत असे थोडेच आहे. मुसलमानांना सापत्नभावाची वागणूक मिळाली असती तर मग इस्मत चुगताई, सरदार जाफरी, महंमद रफी, दिलीप कुमार व पाकिस्तानातल्या इम्रानखान, मेहंदी हसन यांना एवढी लोकप्रियता इथे कशी मिळाली असती ?
पाकिस्तानात अत्यंत लोकप्रिय असलेले आमचे लता मंगेशकर आणि अमिताभ तिकडे पाठवायचे आणि इम्रानखान व मेहंदी हसन इकडे आणायचे. दोन्ही देशातील जनतेचे हे आवडते आहेत. हे झाले सर्वसामान्यांचे मत! राजकीय धुरंधरांना ते परवडणारे नाही. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा दौरा रद्द करावा, अशी मागणी श्रीमती बेनझीर भुत्तोंनीही केली. कारण दिले काश्मीर प्रश्नाचे! मंदिर होण्यास मुसलमानांचा कधीच विरोध नव्हता. पण गोबेल्स तंत्र वापरून सामान्य हिंदूस बुचकळ्यात टाकण्यासाठी सदैव असेच भासवले गेले.
याच सदरात प्रख्यात भारतीय तत्त्ववेत्ता पंडित पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विचार दिले होते. पोलीस बंदोबस्ताशिवाय त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुमारे चार-पाच लाख लोकांची चोख व्यवस्था ठेवली होती, त्यांचे नाव न देता जर ही संपूर्ण माहिती दिली असती तर ती रत्नागिरीत झालेल्या तब्ली इज्तिमातली कुणी इस्लामी तत्त्ववेत्त्याने दिलेल्या प्रवचनाची माहिती वाटली असती. एकेश्वरवादाचे तत्त्वज्ञान, माणसाच्या कल्याणासाठी सांगणारे दोन्ही धर्मात आहेत.
सावरकर जातीयवादी नव्हेत…
आजच्या देशाच्या एकूण दयनीय परिस्थितीत आठवण येते ती वीर सावरकरांची! मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहापासून दूर लोटताना ज्या सावरकरांना आपण हिंदू संघटक म्हणून बोलतो, त्यांना पार विसरून गेल्याचे दिसते. ‘इस्लामी जगत’ मध्ये सावरकर कसे काय? असाही प्रश्न केला जाईल. कदाचित, मुसलमानसुद्धा सावरकरांचे नाव ऐकून नाके मुरडतील. कारणच तसे आहे. सदैव मुसलमानांसमोर सावरकर हे मुसलमानांचे नं. १ चे दुश्मन होते असेच चित्र रंगवले गेले. पण सावरकर थोर राष्ट्रीय नेते, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजवादी विचारवंत होते. ते जातीयवादी मुळीच नव्हते, असे त्यांचा अभ्यास करता दिसून येईल.
तर राष्ट्राचे चित्र वेगळे दिसते…
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहता बॅ. जिना आणि बॅ. सावरकर यांची भेटच कधी होऊ दिली गेली नाही, असे वाटते. हे दोन नेते एकत्र आले असते आणि सुभाषबाबू व गोखल्यांचे अकाली निधन झाले नसते तर आज राष्ट्राचे चित्र वेगळेच असते.
राज्यापुरता जरी विचार केला तरी महाराष्ट्रात ज्या राजकीय हालचाली होतात, आर्थिक घडामोडी होतात त्या धार्मिक / जाती-जमातीवर न होता, मराठी भाषिक म्हणून असायला हवा. सबंध महाराष्ट्र डोळ्यांसमोर असायला त्या मराठी भाषिक या पार्श्वभूमीवर व्हायला हव्यात. जो सहभाग असेल तो मराठी भाषिक म्हणून असायला हवा. संबंध महाराष्ट्र डोळ्यासमोर असायला हवा. राजकारण हे परमेश्वरी कर्तव्य आहे आणि धर्म हा राजकारणाच्या विरोधी नाही, असेच सावरकरांचे मत होते.
देशभक्ती आणि राजनिष्ठा यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला तर देश पहिला आणि राजा दुसरा, देशासाठी राजा, राजासाठी देश नव्हे, हे ओळखून प्रत्येकाने कल्याण साधावे. मोठाल्या क्रांत्या या तलवारीपेक्षा तत्त्वावरच घडवून आणलेल्या असतात, या सावरकरांच्या मताशी मतभेद कसा असू शकतो ?
शिवाजी लढले दास्याविरोधात
“जो शिवाजी त्या वेळेस मुसलमानांशी लढला तोच शिवाजी न्यायी मुसलमानांच्यावतीने लढला असता. कारण शिवाजीचे लढणे हे विशिष्ट जातीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध आहे. ते दास्याविरुद्ध आहे. ते गुलामगिरीविरुद्ध आहे”, हे ऋषि अय्यर यांचे मत सावरकरांना मान्य होते. उत्सवात सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून घेण्यावर सावरकरांचा भर असे. “असले उत्सव व असले प्रसंग म्हणजे कित्येकांनी अशक्य म्हटलेल्या हिंदी राष्ट्रैक्याची मूर्त शक्यता होय”, अशी त्यांची धारणा होती .सावरकर हे मुसलमानांचे कट्टर दुश्मन होते, असे चुकीचे सांगणाऱ्यांनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, सेनापती पांडुरंग महादेव बापट, चंद्रदास कानूनगो आणि मिर्झा अब्बास या तिघांनी बाँब तयार करण्याची कला शिकण्यासाठी ११ जून १९०७ रोजी पॅरिसमध्ये तळ ठोकला. त्यातील मिर्झा अब्बास हे सावरकरांचे सहकारी होते.
सावरकरांचे मुस्लीम सहकारी
१ जुलै १९०५ रोजी लंडनमधील भारत भवनाचे एच. एम. हाइडमन या समाजवादी पत्रकाराच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या भवनातील सावरकरांच्या गटात इतरांबरोबर मिर्झा अब्बास, रफिक महंमद खान हेही होते. सावरकरांचे पॅरिसमधील मित्र जांजोरे यांच्यासारखे समाजवादी नेते ‘ह्युमानिते’ पत्र चालवणारा कार्ल मार्क्सचा नातू जया लोंगे इत्यादींनी राजनैतिक आश्रय मागण्याच्या अधिकाराचा भंग झाल्याबद्दल फ्रान्सच्या मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या सामानाची कसोशीने तपासणी होईल, अशी व्यवस्था होती. तरीही सिकंदर हयात खानासारख्या सावरकरांच्या मित्राने ‘भारतीय स्वातंत्र्य समर’ या इंग्रजी पुस्तकाच्या शेकडो प्रती यशस्वीरित्या लपवून आणल्या. याच खानांच्या फरहानावीना हयात या मुलीवर पाकिस्तानात बलात्कार केल्याचा पाकराष्ट्राध्यक्षांच्या जावयावर आरोप आहे.
नाना मराठे शिकागोला स्वामी विवेकानंदांचे धाकटे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांना भेटले. नंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे सॅनफ्रान्सिस्कोला मौलवी बरकतुल्लाची (गदर पार्टीचे नेते) भेट घेतली. सावरकरांच्या घरात मुसलमान राहात होते. जुलै १९०८ मध्ये बाबाराव सावरकर सक्तमजुरीची शिक्षा भोगून आल्यानंतर ‘अभिनव भारत’च्या सभासदांना दांडपट्टा शिकविण्यासाठी बडोद्याचे प्रा. माणिकराव आणि त्यांचे नाशिकचे शिष्य कृष्णाजीपंत महावत यांनी इब्राहिमभाई नावाच्या मुसलमानाची निवड केली होती. इब्राहिमभाई बाबारावांच्या घरी रहात असत. जेवत असत. २ ते ६ सप्टेंबर १९०८ या पाच दिवसात बाबांनी लाला हरदयाळांचे सहकारी सय्यद हैदर रजा (सय्यद लोक हे आपल्याला थेट पैगंबर वंशातील समजतात.) यांची भाषणे नाशिकच्या गणेशोत्सवात आयोजित केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना, विशाल सागरात बेधडक उडी मारणाऱ्या या महान राष्ट्रभक्तास संकुचित वृत्तीच्या लोकांनी डबक्यात बंदिस्त केले. १९०५ ते १९४० या दरम्यान लंडनमधील सावरकरांच्या खोलीत छत्रपती शिवाजी, राणी लक्ष्मीबाई, गुरु गोविंद सिंग यांचेसह शेवटचे मोगल सम्राट बहादूरशहा जफर यांचे तैलचित्र प्रामुख्याने लावलेले असायचे. आपल्या मातृभूमीसाठी लढणारे हे योध्दे आणि फार महान क्रांतिकारक होते, म्हणून त्यांचा गौरव करायचे. सावरकरांनी आपले ‘स्वातंत्र्याचे समर १८५७’ या पुस्तकाचा शेवटही बहादूरशाह जफरच्या कवितेतील पंक्तींनी केला आहे.
याच पुस्तकात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्या कित्येक मुस्लीम मौलवी, मुस्लीम सैनिक, नबाब यांनी जो महत्त्वाचा वाटा उचलला त्याचे वर्णन केले असून त्यांची कामगिरी वाखाणली आहे. त्यांच्या या पुस्तकावर ब्रिटिशांनी सुमारे ४० वर्षे बंदी घातली होती. म्हणून डॉ. कुटिन्हो या ख्रिश्चन गृहस्थांनी त्यांचे हस्तलिखित लपवून ठेवले होते. मुसलमानांचे बाबतीत सावरकरांचे मत पुढे काही परिस्थितीनुरुप बदलले असेल, परंतू ते त्यांचे कायमचेच मत समजणे बरोबर नाही. आजच्या अवस्थेत त्यांचे मत वेगळेच असते. कारण पुढे १९२४ साली अंदमानातून सुटल्यानंतर जेव्हा ते रत्नागिरीत आले तेव्हा त्यांनीच सर्वांसाठी खुले असे पतितपावन मंदिर बांधलेले आजही आहे.
‘हिंदू’ शब्दाचा अर्थ
१९३७ साली विनाअट त्यांची मुक्तता झाल्यावर त्यांनी ‘हिंदू’ या शब्दाचा साधा सरळ अर्थ लावला तो असा. हिंद कोण? कोणीही जो हे मान्य करतो की, सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भूमीस आपली जन्मभूमी मानतो आणि आपली मातृभूमी मानतो आणि आपली कर्मभूमी समजतो. आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटतो तो / ती !
भारताच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांना झटण्याचे व योगदान देण्याबाबत वीर सावरकर म्हणाले, “तुम्ही सोबत आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याविना, आणि तुम्ही विरोध केलात, तरी तुमच्याशिवाय आम्ही भारताचे स्वातंत्र्य मिळवूच.” तत्पूर्वी त्यांनी, “काऊ इज जस्ट अ यूजफुल अॅनिमल – अ गॉड नेव्हर” असे म्हणून आपल्या हिंदू अनुयायांना धक्का दिला होता.
आणि शेवटी त्यांनी आपल्या निधनानंतर काहीही वैदिक विधी करू नयेत, असे सांगितले होते. म्हणून त्यांच्या निधनानंतर वैदिक विधी केले गेले नाहीत. तसेच त्यांची रक्षा वेगवेगळ्या भांड्यात जमा करून नंतर काढल्या ना कुठल्या पवित्र शहरात किंवा नदीत विसर्जित केल्या गेल्या नाहीत.
अशा या वीर सावरकरांचे बाबतीत मुसलमानांनी अधिक जाणून घ्यायला हवे. माझ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या पुण्यतिथीवर लिहायला सांगितले. तेव्हाही लिहिता येईल अधिक तपशीलात परंतु आजच्या काहीशा दुर्मीळ वातावरणात मुसलमान सावरकरांचे चित्र तर सोडाच, पण नाव उच्चारताना ते कोणीतरी जातीयवादी होते असे समजतात. त्यांना समजायला हवे की, ते तसे नसून थोर विचारवंत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून राष्ट्र उभे करणारे चिंतक व समाजवादी विचारसरणीचे क्रांतिकारक होते.
म्हणूनच ते म्हणत होते, “माझी समुद्रातील उडी विसरलात तरी चालेल, पण मी दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विसरू नका किंवा गाय हा उपयुक्त पशू आहे. देवता नव्हे” या सावरकरांच्या विचारांची त्यांचे अनुयायीही दखल घेत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. मुसलमानांनी सावरकर पूर्णतः अभ्यासायला हवेत. त्यांच्या गाय हा उपयुक्त पशू आहे. या विधानाचा आदर करून बहुसंख्याकांच्या भावनांची कदर करायला हवी.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण
श्री. अतिक बाळ पाटणकर,
पत्रकार कॉलनी, कुवार बाव, रत्नागिरी.
मोबाईल – ९४२१२३३७८६
मुल्य : रुपये ५००/=
कुमार कदम
