कालिदास नाट्यगृहात ‘मराठी बोलींचा उत्सव’ संपन्न
हरिभाऊ लाखे
नाशिक : मराठी बोलींचा महोत्सवाचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत कालिदास नाट्यगृह येथे दादासाहेब फाळके रंचमंचावर करण्यात आला.
या महोत्सवात ‘अरे संसार संसार’ कवयित्री बहिणाबाईंच्या गाणी, बोहाडा, अहिराणी गीतांना कार्यक्रम, विदर्भातील झाडीपट्टीतील नाट्यप्रयोग, आरोधी लोकनृत्य आणि लोकगीते, शिवबाचा जागर आणि ‘शिकायला गेलो एक’ हे प्रशांत दामले आणि ऋषिकेश शेलार अभिनित लोकप्रिय मराठी विनोदी नाटक सादर करण्यात आले.
बोली भाषा महोत्सवाच्या पहिल्या सत्रात जळगाव येथील परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिणाबाईंची गाणी आणि कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतून जीवनदृष्टी मिळते, कृषी परंपरचे प्रगटीकरण होते. बहिणीबाईंची गाणी आणि कविता या जीवनाचे भाष्य शिकवते. दिग्दर्शक नारायण बाविस्कर, हार्मोनियम गोविंद मोकाशी, तबला पांडुरंग पाटील, बासरीवादन यश महाजन, हँन्डसोनिक रोहीत बोरसे यांनी वाद्यसंगत केली. तर श्रध्दा कुलकर्णी, अंजली धुमाळ, अक्षय नेहे, शुभार्थी कुलकर्णी, सोनाली राजे शिर्के पत्तटील, समृद्धी पाटील, सुनीला भोलाणे आणि हर्षल पाटील या गायकांनी बहिणाबाई यांच्या कविता सादर केल्या. बहिणाबाईंच्या काव्यातून त्यांची बुद्धीचातुर्य दिसते, जसे की, लेकीचा संसार चांगला व्हावा, लेक नांदावी म्हणून लेकीची माय कशी सासरी नांदते याचा प्रत्यय ‘अरे संसार संसार’ या कवितेतून करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमधील दुर्गम भागातील परंपरा बोहाडा नृत्यप्रकार त्र्यंबकेश्वर येथील मोखाडा येथील आदिवासी कलाकारांनी सादर केला. राजन वैद्य हे बोहाडा नृत्यप्रकारातील जाणते कलाकाराने अतिशय उत्तम कलाकृती सादर करत ४५ कलाकरांचा ताफा सोबत घेऊन अध्यात्मच प्रत्यक्ष रंगमंचावर सादर केला. बोहाडा मुखवटे नृत्यप्रकार सादर होत असतांना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येऊन रोमांच निर्माण केला. यामध्ये गणेशपूजन, हनुमान, खंडेराव, भैरवनाथ, त्राटीका (शूर्पनखा), गजासूर, नरसिंव्ह आणि रक्तबीज या असूरांचा संहार करण्यासाठी प्रकटलेली रक्तादेवी यांचे नृत्य सादर झाले. या नृत्यामध्ये रक्तादेवी ही रक्ताबीजाचा अंत करण्यासाठी रक्ताबीज या असूराचे रक्त प्राशन करताना झालेले युद्ध रंगमंचावर सादर करताना प्रेक्षकांचे डोळे विस्फारले आणि हा क्षण अक्षरश: रोमांच निर्माण करणारा ठरला.
