ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्चला
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती १३ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकूण ६ वयोगटामध्ये जलद बुध्दिबळ स्पर्धा ७ मार्च रोजी सकाळी ९ वा. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात होणार आहे. ही स्पर्धा मुलामुलींसाठी स्वतंत्र गटात होणार असून एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक गटातील प्रथम पुरस्कार विजेत्या स्पर्धकांच्या मातांना आयडियल संस्थेच्या सल्लागार स्व. सुरेखा कडवे स्मृती सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ७/१०/१३ वर्षाखालील मुलामुलींच्या स्वतंत्र ६ वयोगटात ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीच्या किमान ४ फेऱ्यांमध्ये रंगणार आहे. प्रत्येक साखळी फेरी १५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे स्पर्धकांना बुध्दिबळ पट व घड्याळ दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे व्हॉटसअॅपवर १ मार्चपर्यंत संपर्क साधावा.
