वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीसंदर्भात नागरिकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. वर्दळीच्या ठिकाणी हा मोबाईल टॉवर उभारल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर करून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, संतोष पाटील, गोरक्ष शिंदे तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला उपस्थित होते.
मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी, राज्य शासनाची परवानगी तसेच दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांच्या नियमांचे पालन, ईएमएफ रेडिएशन नॉर्म्स, सार्वजनिक सुरक्षितता, नागरी नियोजन व रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अनिवार्य आहे. या ठिकाणाच्या अगदी जवळ शाळा, निवासी वस्ती आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या असल्याने मोबाईल टॉवरमधून निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विविध अभ्यासांनुसार डोकेदुखी, झोप न लागणे, थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्तीवर परिणाम, हृदयविकाराशी संबंधित तक्रारी तसेच कर्करोगाचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शालेय मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
महानगरपालिका ही नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेची जबाबदार संस्था असल्याने, सदर परवानगी सर्व निकष पूर्ण करूनच देण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंधित कंपनीस दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी सुरक्षित ठिकाण निश्चित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व भविष्यातील पिढीचा विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वल्ली राजन यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *