Month: February 2026

मलंगगडाबाबत न्यायालय आपल्याला लवकरच न्याय देईल- एकनाथ शिंदे

मलंगगडाबाबत न्यायालय आपल्याला लवकरच न्याय देईल- एकनाथ शिंदे ठाणे  : श्री मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात न्यायालय लवकरच आपल्याला न्याय देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माघी पौर्णिमेच्या दिवशी…

स्फुर्ति महिला सामाजिक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रवास वर्णन कथालेखन स्पर्धा

स्फुर्ति महिला सामाजिक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रवास वर्णन कथालेखन स्पर्धा कल्याण :  स्फुर्ति महिला सामाजिक संस्था, डोंबिवली दरवर्षी महिलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा घेत असते.  यावर्षी कथा-लेखन कींवा प्रवास वर्णन ही स्पर्धा आयोजित केली असून यापैकी एक लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. कथा स्पर्धेसाठी सामाजिक विषयावर कथा लिहावी. मात्र ती कथा स्वलिखीत आणि अप्रकाशित असावी. वादग्रस्त नसावी.   कथा मराठीतच असावी. ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासकांकडून या कथा लेखनाचे व प्रवास वर्णनाचे परीक्षण होईल. तीन क्रमांक निवडुन  बक्षिसे दिली जातील. संपर्क: ९०८२४१२३०४, ७५०६३०८९१८

राष्ट्रवादी काँग्रेस-रदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक यासीन कुरेशी, दिपाली भगत,…

 प्रसन्न गोळे विजेता

एमजेएससी कॅरम स्पर्धा प्रसन्न गोळे विजेता जैतापूरचा आर्यन राऊत उपविजेता मुंबई :   माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतला निर्णायक बोर्डातील अप्रतिम फिनिशद्वारे १५-९ असे पराभूत केले आणि अजिंक्य पदाला गवसणी घातली. परिणामी शेवटचा बोर्ड हातचा निसटल्यामुळे आर्यन राऊत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण सोहळा नगरसेवक यशवंत किल्लेदार, क्लबचे पदाधिकारी सुनील पाटील व महेश शेट्ये, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिवाजी पार्क येथील एमजेएससी स्पर्धेमधील उपांत्य फेरीत आर्यन राऊतने शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेचे आव्हान १२-७ असे तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवचे आव्हान २३-० असे संपुष्टात आणून अंतिम फेरीत धडक दिली होती. विविध जिल्ह्यातील ४२ शालेय खेळाडूंमध्ये होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीची चैतन्या पोमेंडकर, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीचे प्रसाद माने व शिवांश मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी यांनी उपांत्यपूर्व उपविजेते तर कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा विराज बर्वे, पार्ले टिळक विद्यालयाचा दुर्वेश चव्हाण, सीएनएम स्कूलचे अर्णव शाह व दैविक जैन, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची सारा देवन यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार स्ट्रायकरसह पटकाविला. स्पर्धेतील सहभागी शालेय खेळाडूंना रुपये पाचशे विशेष पुरस्कार देण्यात आला. शालेय  कॅरमपटूंना सातत्याने सर्वतोपरी प्रोत्साहन मोफत उपक्रमाने दिल्याबद्दल पालक व शिक्षक वर्गाने संयोजकांच्या मोफत उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून ‘दादांच्या’ अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन…

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून ‘दादांच्या’ अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन… मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधीपूर्वक बाणगंगा तलाव वाळकेश्वर येथे करण्यात आले. अमर रहे…अमर रहे… अजितदादा अमर रहे… अशा घोषणा देत अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी,प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, मुंबई उपाध्यक्ष कप्तान मलिक, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे,इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव,महिला अध्यक्षा आरती साळवी , कार्याध्यक्षा मनिषा तुपे, ओबीसी सेलचे मुंबई अध्यक्ष बबन मदने, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई सरचिटणीस दिपक पारडीवाला आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, महिला तालुकाध्यक्षा,पक्षाचे प्रदेश, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एमसीसी सांताक्रूझच्या विजयात समर्थ चमकला

एमसीसी लिटिल स्टार लीग क्रिकेट स्पर्धा एमसीसी सांताक्रूझच्या विजयात समर्थ चमकला मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग क्रिकेट स्पर्धेत (१४ वर्षांखालील) एमसीसी सांताक्रूझने स्पायडर सीसीवर १५ धावांनी विजय मिळवला. त्यात समर्थ चमकला. एमसीसीच्या २०७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पायडर संघ ४० षटकांत ५ बाद १९१ धावाच करू शकला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत एमसीसी सांताक्रूझने दोनशेपार मजल मारली. त्यात समर्थने ७४ चेंडूत ५६ धावा करताना मोलाचे योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघाकडून सोनाक्षी सोलंकीने १६ धावांत ३ विकेट घेतल्या. त्यानंतर सोलंकीने (११२ चेंडूत ८३ धावा) फलंदाजीतही छाप पाडली तरी त्याला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. समर्थने ३४ धावांत एक विकेट घेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यानेच सामनावीराचा पुरस्कार पटकावला. एमसीसी सांताक्रूझ – ४० षटकांत ९ बाद २०६(समर्थ ५६(७४), सोनाक्षी सोलंकी ३/१६) वि. स्पायडर सीसी — ४० षटकांत ५ बाद १९१(सोनाक्षी सोलंकी ८३(११२), आकर्षक गुप्ता २/३६). निकाल: एमसीसी सांताक्रूझ १५ धावांनी विजयी. सामनावीर: समर्थ ५६ (७४) आणि १/३४ एमसीसी ठाणे ब – ४० षटकांत ८ बाद १६१(क्रिश शर्मा ५६*(६३), विहान वॅडे २/८) वि. स्पायडर सीसी – २१.२ षटकांत ३ बाद १६२(विराट सिंग ५०(३५), दिशांत फुलोरे १/१५). निकाल: स्पायडर सीसी ७ विकेट राखून विजयी. सामनावीर: हृधान चौहान २/९ आणि ३६(३९).

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राची दणदणीत कामगिरी! किशोर–किशोरी संघ उपउपांत्यपूर्व फेरीत कुरुक्षेत्रच्या थीम पार्क मैदानावर वेग–चपळाई–डावपेचांचा जल्लोष महाराष्ट्राचा राष्ट्रीय रंगमंचावर धमाका हरियाणा  : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून खेळ साकारत उपउपांत्यपूर्व फेरीत दणक्यात प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर प्रत्येक सामन्यात आक्रमकता, अभेद्य संरक्षण आणि अचूक डावपेच यांचा सुरेख संगम दिसून आला. महाराष्ट्राने निर्णायक क्षणी खेळ उंचावत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला आणि विजयांची मालिका कायम ठेवली. किशोर गट : महाराष्ट्राची हरियाणावर एकतर्फी सरशी उपउपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्राने हरियाणाचा एक डाव १८ गुणांनी (२८–१०) पराभव केला. महाराष्ट्राकडून अभिराज वाळंज (२.१० मि. संरक्षण), प्रफुल्ल वसावे (नाबाद १.५०, २.५० मि. संरक्षण व २ गुण), सोहम देशमुख (३ मि. संरक्षण व ४ गुण), वेदांत गायकवाड (८ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत विजय निश्चित केला. हरियाणाकडून हिमान (१.४०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण), योदीत (१.१५ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले; मात्र महाराष्ट्राच्या वेगापुढे ते अपुरे ठरले. किशोरी गट : महाराष्ट्राची मणिपूरवर डावाने मात किशोरी गटात महाराष्ट्राने मणिपूरचा एक डाव ३३ गुणांनी (४३–१०) पराभव करत उपउपांत्यपूर्व  फेरी गाठली. महाराष्ट्राकडून राही पाटील (२.१० मि. संरक्षण व ८ गुण), अपर्णा वर्धे (४.१० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (३ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी दमदार कामगिरी केली. मणिपूरकडून आयेशाने चांगला खेळ केला. किशोर गट : पंजाबची केरळवर काठावरची बाजी पंजाबने केरळचा ५ गुणांनी (३५–३०) पराभव करत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. पंजाबकडून शिवकुमार (३.३० मि. संरक्षण व २ गुण), विरेंद्रजित (१.४० मि. संरक्षण व ८ गुण), श्याम मित्तल (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. केरळकडून के. अभय (१, १.१० मि. संरक्षण), प्रत्युश (१ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी कडवी झुंज दिली. किशोर गट : विदर्भची वेस्ट बंगालवर धडाकेबाज मात विदर्भ संघाने प. बंगालचा ५ गुणांनी (३५–३०) पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. विदर्भाकडून रोशन (१.१४ मि. संरक्षण व ६ गुण), तन्मय (१, १ मि. संरक्षण व ८ गुण), कल्पेश (१ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. वेस्ट बंगालकडून एस. के. नबी (१, १.२० मि. संरक्षण व ८ गुण), राज (१.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. किशोर गट : कोल्हापूरचा राजस्थानवर डावाने धक्का चौथ्या सामन्यात कोल्हापूरने राजस्थानचा एक डाव २४ गुणांनी (४२–१८) पराभव करत सहज विजय मिळवला. कोल्हापूरकडून सत्यराज वाडेकर (२.१०, ३.२० मि. संरक्षण व २ गुण), गौरव माने (२ मि. संरक्षण व ८ गुण), सोहम भाटमारे (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चमकदार खेळ साकारला. राजस्थानकडून तनिष (१.१० मि. संरक्षण व २ गुण) याने प्रतिकार केला. किशोरी गट : हरियाणाची विदर्भावर काठावरची सरशी हरियाणाने विदर्भवर २७-२३ असा ४ गुण व ३ मिनिटे राखून विजय मिळवला. हरियाणाकडून पलक (१.३०, १.५० मि. संरक्षण व २ गुण), कोमल (१.५०, १.१० मि. संरक्षण), अंजली (१.२०, १.२० मि. संरक्षण) यांनी प्रभावी खेळ केला. विदर्भकडून मनवी (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), नव्या (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या संघांची यादी किशोर गट : महाराष्ट्र, पंजाब, मणिपूर, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिसा, कर्नाटक, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात, कोल्हापूर, हरियाणा, तेलंगणा. किशोरी गट : महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, कोल्हापूर, राजस्थान, केरळ, ओडिसा, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, मणिपूर, कर्नाटक.

 भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च

भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च मुंबई : भांडुपच्या येथील रात्रीच्या अंधारात विसावलेली असतानाच मेट्रो मार्गिका चार  (४) एक  महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.  भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले. यात “हेवी ड्युटी क्रेन्स” आणि “१२ मल्टी-अ‍ॅक्सल” वाहनांच्या सहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी मुंबई महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस तसेच परिसरातील रहिवासी व दुकानदार यांच्यासोबत “एमएमआरडीए”नेही उत्कृष्ट समन्वय साधला आहे. उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे चार रात्री लागणारे हे काम अवघ्या दोन रात्रींमध्ये पूर्ण करण्यात यश आले.       या मोहिमेसाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. नागरिकांना अत्यल्प त्रास होईल, याची विशेष काळजी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले. या “स्टील स्पॅन्स”च्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका ४ च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

४ फेब्रुवारी रोजी ठाण्यात चिन्मय मिशनचा अमृत यात्रा महोत्सव

४ फेब्रुवारी रोजी ठाण्यात चिन्मय मिशनचा अमृत यात्रा महोत्सव ठाणे : गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांनी अद्वैत वेदान्त, भगवद्गीता आणि उपनिषदांचे ज्ञान प्रसृत करण्यासाठी १९५३ मध्ये चिन्मय मिशनची स्थापना केली. जगभरातील चिन्मय मिशन केंद्रे कोणत्याही भेदाभावाशिवाय सर्वांच्या कल्याणासाठी हे ज्ञान पसरवतात. चिन्मय मिशन, ठाणे येथे ७५ वा अमृत यात्रा महोत्सव बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री मुरलीधर मंदिर, ऋतू एन्क्लेव्ह, घोडबंदर रोड, ठाणे येथे साजरा केला जाईल. कार्यक्रमाची सुरुवात गुरु पादुका पूजनाने होईल. त्यानंतर भक्तिमय भजनांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गीता पंचामृत’ची ओळख, जे गीतेचा सार पाच श्लोकांमध्ये सादर करते. अस्वस्थ मनांसाठी हे एक रामबाण उपाय आहे. भगवद्गीतेशी जोडले जाण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि हे पाच शब्दरूपी अमृताचे थेंब शुद्ध ज्ञानाकडे घेऊन जातात. चांगले असण्याचा आणि चांगुलपणा वाटण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हे सर्वांसाठी खुले निमंत्रण असल्याचे मिशन च्या वतीने सांगण्यात आले आहे.

कुस्तीपटू कोमल पटेलला रौप्य पदक

कुस्तीपटू कोमल पटेलला रौप्य पदक ठाणे : वसंतदादा कुस्ती केंद्र यशवंत नगर सांगली या ठिकाणी संपन्न झालेल्या २० वर्षा खालील राज्यस्तरिय     महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर येथील  श्री गणेश आखाड्यातील कुस्तीपटू कोमल पटेलने  रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध वजनी गटातून निवड झालेल्या पैलवानांचा समावेश होता. ५० किलो वजनी गटात कोमलने पहिल्या फेरीत पुणे शहर जिल्ह्याच्या पूर्वा परदेशीला १० तांत्रिक गुणांच्या फरकाने सहज नमवले. दुसऱ्या  फेरीत कोमलने जळगावची कसलेली मल्ल समीक्षा काळेला चितपट केले. या कुस्तीत कोमलने  क्षणाचा ही विलंब न लावता झोळी या डावाची पकड घेत समिक्षाला चितपट करत सर्वांना अचंबित केले. तिसऱ्या फेरीत देखील‌ तिने मुंबई उपनगराच्या रसिका माळीला  चितपट करत अंतिम फेरीत मजल मारली. निर्णायक सामन्यात कोमलची लढत अनुभवी, अनेक पदके जिंकलेल्या  कोल्हापूरच्या गौरी पाटीलशी होती, पण अखेर अनुभवाने वरचढ असलेल्या गौरीने कोमलला  तांत्रिक गुणांच्या जोरावर नमवुन सुवर्ण पदक मिळवले. तर कोमलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कोमल ही सध्या अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या कॉलेज मध्ये कला शाखेच्या   प्रथम वर्षात  शिकत आहे . राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धेत कोमलचे हे पहिलेच पदक होते. श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा  वसंतराव पाटील , वैभव माने यांचे मोलाचे  मार्गदर्शन कोमलला मिळत आहे.