Month: March 2026

महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली नाकाबंदी

महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली नाकाबंदी कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन व परिसरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनात फक्त महिला अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी करत वाहतूक विभागासह सयुक्त कारवाई केली.  या नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करून चलान देण्यात आले. तसेच स्टेशन परिसरात पायी पेट्रोलिंग केली. स्कायवाक पेट्रोलिंग, दरम्यान केडीएमसी अतिक्रमण विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी विविध कलमान्वये एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान ४ महिला अधिकारी व ३२ महिला पोलीस अमलदार हजर होते.

हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते 

सुरेखा कडवे स्मृती बुध्दिबळ स्पर्धा हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील १३ वर्षाखालील गटात हिरण्मयी कुळकर्णी, १० वर्षाखालील गटात अथर्व मुळीक आणि ७ वर्षाखालील गटात निधीश खोपकर यांनी विजेतेपद पटकाविले. परिणामी विजेत्यांबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या मातांचा देखील आदर्श महिला पुरस्काराने अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर जी. क्वाड्रसने स्कॉच ओपनिंगचा प्रयोग करीत हिरण्मयी कुळकर्णीच्या राजावर प्रारंभी जोरदार हल्ले केले. परंतु बचाव तंत्राचे अचूक डावपेच रचून अपराजित हिरण्मयीने २८ व्या मिनिटाला बाजी मारली. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णीने (४.५ गुण) प्रथम, जी. क्वाड्रसने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (२.५ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, प्रणव जैनने (३.५ गुण) द्वितीय, अर्णव जगतापने (३ गुण) तृतीय; १० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम, साध्या जाधवने (३ गुण) द्वितीय, विधी येसणेने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये अथर्व मुळीकने (५ गुण) प्रथम, कैवल्य परबने (४ गुण) द्वितीय, अर्णव शेटेने (३ गुण) तृतीय तर ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये मिर्या तिवारीने (४ गुण) प्रथम, मनस्वी पाटीलने (४ गुण) द्वितीय, पेहेर शाहने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये निधीश खोपकरने (५ गुण) प्रथम, आरुष नेवस्करने (२.५ गुण) द्वितीय, सार्थ शाहने (२.५ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

 प्रभादेवीत चढाई-पकडींचे द्वंद्व ९ मार्चपासून

प्रभादेवीत चढाई-पकडींचे द्वंद्व ९ मार्चपासून राज्यातील १८ दिग्गज संघ स्वामी समर्थच्या कबड्डीत भिडणार मुंबई, दि. ८ (क्री.प्र.)- मुंबई कबड्डीची खरी ताकद म्हणजे मंडळ आणि क्लबचे संघ. हेच स्थानिक संघ प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेनिमित्त आपली ताकद दाखवायला सज्ज होत आहेत. टी-२० वर्ल्ड कपची फटकेबाजी थांबताच सोमवार ९ मार्चपासून  कबड्डीचा चढाई-पकडींचा पाचदिवसीय खेळ रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीला कबड्डी पंढरीचे रुप प्राप्त झाले असून यात राज्यातील अव्वल १८ स्थानिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८३ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेला ग्लॅमरस करण्यासाठी इंडियन ऑइल, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, आरसीएफ, बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत बँक, मुथूट फायनान्स, आरबीएल बँक आणि बँक ऑफ इंडिया कंपन्यांनी आर्थिक सहकार्य दिले आहे. त्यामुळे कबड्डी आयोजनातल्या या दादा मंडळाने राज्यातील एकापेक्षा एक अशा स्थानिक पुरुष संघांना स्पर्धेत निमंत्रित केले आहे. आजवर व्यावसायिक कबड्डी संघांची मेजवानी सादर करणार्‍या मंडळाने मुंबई शहरच्या तगड्या १२ संघांसह उपनगर, पुणे, नांदेड, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांनी दिली. प्रो कबड्डीच्या ३० सुपरस्टार्सचीही चढाई या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार  प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात भारतीय रेल्वेचा पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, तसेच अस्सल मुंबईकर संकेत सावंत, पुणेरी पलटणचा आकाश शिंदे, यु मुंबाचा अजित चव्हाण असे तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा या सुपरस्टार खेळाडूंच्या उपस्थितीत कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधिश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊणलाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही २५ हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी घसघशीत रोख पुरस्कार तर चढाई आणि पकडवीरालाही रोख इनाम दिले जाणार आहे. राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ अ गट : सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई शहर), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई शहर. ब गट : विजय नवनाथ मंडळ (मुंबई शहर), विजय क्लब (मुंबई शहर), एसएसजी फाऊंडेशन (मुंबई शहर) क गट : सिद्धीप्रभा फाऊंडेशन (मुंबई शहर), ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकूर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर) ड गट : वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई शहर), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई शहर) इ गट : स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन अ‍ॅकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई शहर) फ गट : गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात महिला वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव अनिल ठाणेकर ठाणे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे रविवारी भल्या पहाटे ५:३० वाजता ठाणे स्टेशन परिसरात एका आगळ्यावेगळ्या ‘महिला सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. उन्हाळा, पावसाळा असो वा कडाक्याची थंडी, पहाटेच्या अंधारात घराबाहेर पडून घराघरात ज्ञान पोहोचवणाऱ्या महिला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी महिला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. “शहराच्या प्रगतीत आणि माहिती पोहोचवण्याच्या कार्यात या भगिनींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.या सोहळ्याला संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश मोरे, ‘शब्दमुद्रा’ वृत्तपत्राचे संपादक प्रफुल वाघुले, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, शहर प्रमुख नंदू देशपांडे, ठाणे स्टेशन विभाग प्रमुख संदीप आवारे, चंद्रकांत पवार, राजू शेलार, नंदू करले, सखाराम चव्हाण, संजय भुजबळ, शंकर पाटील आणि ज्येष्ठ विक्रेते विठ्ठल गांगुर्डे यांसह अनेक पदाधिकारी व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित महिला वृत्तपत्र विक्रेत्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. पहाटेच्या वेळी जेव्हा शहर निद्रावस्थेत असते, तेव्हा आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या महिलांचा उत्साह पाहून उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

कष्टकरी महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाकडून विशेष सन्मान

कष्टकरी महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाकडून विशेष सन्मान अनिल ठाणेकर ठाणे : धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. समाजातील कष्टकरी आणि परिश्रमाने कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करून तसेच विविध प्रकारची मेहनत करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या कष्टकरी महिलांचा विशेष सत्कार धनगर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. समाजातील महिलांनी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पुष्पगुच्छ देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मासुंदा तलाव येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत महिलांसाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणेची आठवण करून दिली. या कार्यक्रमाला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे तसेच सदस्य संगीता खटावकर, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, स्मिता गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमात महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा केला तसेच महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. समाजातील महिलांनी एकमेकांना प्रोत्साहन देत पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

राष्ट्रवादी शरद पवारच्या आरोग्य शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी

राष्ट्रवादी शरद पवारच्या आरोग्य शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी अनिल ठाणेकर ठाणे : महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ॠताताई आव्हाड, सिद्धीविनायक रूग्णालयाचे डॉ. अमोल गिते यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात महिलाध्यक्षा मनिषा भगत,  कार्याध्यक्षा फुलबानो पटेल आणि साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २९७ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. घर-संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देत नसतात. त्यातच संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. ही बाब ध्यानात घेऊन ८ मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, तुळजाभवानी मंदिराशेजारी, गणेशवाडी पांचपाखाडी ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हृदयरोग तपासणी, (ECG), किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह (शुगर) आदी आजारांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या महिलांवर मोफत शस्त्रक्रिया सिद्धीविनायक रूग्णालयात करण्यात येणार आहेत. याप्रसंगी ॠता आव्हाड यांनी, महिला घर चालविताना स्वतःच्या आरोग्याचे बजेट आखत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष नेहमीच जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केले असल्याचे मनिषा भगत यांनी सांगितले. डॉ. अमोल गिते यांनी, या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन प्रोस्टेटवर मोफत  शस्त्रक्रिया, मोफत डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सांगितले. दरम्यान , महिला दिनाच्या अनुषंगाने ऋता आव्हाड, मनिषा भगत यांच्य् हस्ते महिला पत्रकार अनघा सुर्वे, रोहिणी दिवाण, सुचिता बिराजदार, सारिका साळुंके, नम्रता सूर्यवंशी,  वंशिका चाचे, जयश्री शेट्टी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, नवनिर्वाचित नगरसेविकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी जगताप ,रिटा यादव ,वर्षा मोरे ,सुषमा पाटील ,सपना पाटील, अश्विनी पालकर , नीलिमा शेख , माधुरी सोनार , शशिकला पुजारी , ज्योती निम्बर्गी , मनीषा पाटील , मल्लिका पिल्ले, हाजी बेगम , मुनिपा सय्यद , रेणुका अलगुडे,  रेशमा भानुशाली, कल्पना नार्वेकर,  रुबीना सय्यद, उषा नरहरे,पूजा जाधव , गीतारंजन , श्रुती डिसोलकर , ज्योती चव्हाण, संगीता चंद्रवंशी , लिलाबाई फुलपगारे ,संगीता लोकरे आदी उपस्थित होते.

‘रहाडी’ मध्ये ‘धप्पा’

‘रहाडी’ मध्ये ‘धप्पा’ नाशिकमध्ये रंगपंचमीचा अपूर्व उत्साह हरिभाऊ लाखे नाशिक – ‘रहाड’ संस्कृतीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली नाशिकची रंगपंचमी अभूतपूर्व उत्साहात साजरी होत आहे. रंगांनी तुडूंब भरलेल्या शहरातील आठ रहाडींमध्ये उड्या मारण्यासाठी म्हणजेच ‘धप्पा’ मारण्यासाठी तरुणाईत चढाओढ सुरु आहे. रहाडींची विधीवत पूजा झाल्यानंतर रहाडींमध्ये रंगप्रेमी डुंबू लागले. नाशिकमध्ये होळी, धुलिवंदन नव्हे तर, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. नाशिकमध्ये पेशवेकालीन अनेक रहाडी आहेत. रहाड म्हणजे पेशवेकाळात बांधलेले मोठे हौद. साधारणपणे एखाद्या छोट्या बारवप्रमाणे यांचे स्वरूप असते. दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी या रहाडी खोदल्या जातात. आणि रंगपंचमीनंतर पुन्हा त्या मातीने बुजविल्या जातात. या रहाडी प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहेत. त्यापैकी यंदाच्या रंगपंचमीसाठी आठ रहाडी तयार झाल्या. नाशिकमध्ये जुन्या काळात म्हणजेच १८ व्या शतकात १८ पेक्षा अधिक रहाडी होत्या, असे सांगितले जाते. त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडींच्या ठिकाणी वाडे बांधले गेले. त्यामुळे काही रहाडी कायमच्या अस्तंगत झाल्या. आता शहरातील आठ रहाडी रंगपंचमीसाठी तयार झाल्यात. त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन, शिवाजी चौक आणि दंडे हनुमान चौक येथील रहाडींचा समावश आहे. तसेच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजेबहाद्दर लेन येथील रहाड सुमारे ८० वर्षानंतर यंदा उकरण्यात आली. अशाप्रकारे शहरात यंदाची रंगपंचमी आठ रहाडींमध्ये होतआहे. या प्रत्येक रहाडींची खोली साधारणपणे १० फूटपेक्षा अधिक असते. रंगपंचमीनिमित्त रविवारी सकाळपासून रहाडी वेगवेगळ्या रंगांनी भरण्यात आल्या. त्यात राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, शनी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी, दंडे हनुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा, शिवाजी चौकातील रहाडीचा रंग लाल आहे. रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले. प्रारंभी हा रंग मोठ्या भांड्यांमध्ये उकळविण्यात आला. त्यानंतर तो रहाडींमध्ये टाकण्यात आला. रहाडींचे पूजन झाल्यानंतर परंपरेनुसार मानकऱ्यांनी प्रथम रहाडीत उड्या मारल्या. त्यानंतर मग रहाडीत डुंबण्यासाठी एकच चढाओढ सुरु झाली. रंगपंचमी आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याने जुनी तांबट लेने, मधली होळी आणि राजेबहाद्दर लेन येथील रहाडींमध्ये मानकऱ्यानंतर सर्वप्रथम महिलांना डुंबण्यास प्राधान्य देण्यात आले. महिलांसाठी खास वेळ ठरवून देण्यात आली होती. ती वेळ संपल्यानंतर पुरुषांनी रहाडींमध्ये झोकून देण्यास सुरुवात केली. मेनरोडवरील संत गाडगे महाराज चौकात सार्वजनिक रंगपंचमीसाठी खास शाॅवरची व्यवस्था करण्यात आली होती. संगीताच्या तालावर येथे तरुणाईची झुंबड उडाल्याचे दिसून आले.

रामदास आठवले यांना कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

रामदास आठवले यांना कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक संपन्न ! मुंबई : (अशोक गायकवाड )—रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्याने त्यांना शुभेच्छा व आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व मंत्री आठवले यांचे आशीर्वाद घेतले . यावेळी झालेल्या बैठकीत १४ एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २० मार्च महाड येथील ऐतिहासिक सत्याग्रह (क्रांती दिन) तसेच ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिन संदर्भातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी महाड येथे २० मार्च हा दिवस क्रांती दिन तसेच ऐतिहासिक सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी २० मार्च २०२६ हा ९९ वा क्रांती दिन असल्यामुळे पुढील वर्षी १०० वा शताब्दी ‘क्रांती दिन’ साजरा होणार आहे. या अनुषंगाने महाड येथील क्रांतीभूमी, परिसर व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व सुशोभीकरण करून त्या स्थळाचा राष्ट्रीय स्मारकाच्या धर्तीवर विकास करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री आठवले यांनी सूचना दिल्या. या बैठकीत कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रलंबित कामांचा प्रस्ताव मांडला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका उपाध्यक्ष नितीन मोरे, मुख्य प्रभारी पनवेल महानगरपालिका क्षेत्र, मोहनिष गायकवाड, उपाध्यक्ष पनवेल महानगरपालिका क्षेत्र, प्रभू मधुकर जाधव, पनवेल विधानसभा अध्यक्ष, विजय गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीस उपस्थित राहून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस

3७ लाख महिलांना लखपती दीदी योजनेत जोडून घेणार – देवेंद्र फडणवीस मिरा – भाईंदर: महिला या अर्थव्यवस्थेचे दुसरं चाक आहेत हे विकसित देशात दिसून आला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नारिकेंद्रित विकासाला प्राधान्य दिलं आहे त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जगात चौथी अर्थव्यवस्था झाली आहे. बेटी बचाव आणि बेटी पढाव पासून सुरू असलेली हे अभियान लखपती दीदी पर्यंत येऊन पोहोचले आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. श्रीमती मु्थूलक्समि रेड्डी यांच्या विधान मंडळ सदस्य शताब्दी आणि महिला दीनानिमित्त आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात ‘विकसित नारी शक्ती संगम’ या दोन दिवसांच्या परिषदेत ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, २०२९ मध्ये तेहतीस टक्के महिला खासदार असणार आहेत आणि त्या देशाचं नेतृत्व करणार आहेत. महिलांना दिलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड होते त्यामुळे नवीन उद्योगपती महिला तयार होतं आहेत.  यावेळी मंचावर ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार,  राज्यसभा सदस्य रेखा महाजन,  तसेच मिरा – भाईंदरच्या प्रथम नागरिक डिंपल मेहता उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणले, ग्रामपंचायत महिलांनी स्वतः काम करावं, स्वतः निर्णय घ्यावेत हे उद्दिष्ट ठेवाव.  राज्यसभा सदस्य तसेच रामभाऊ म्हाळगी चे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की तीस वर्षांपूर्वी महिला राजकारणाचा अहवाल म्हाळगीने तयार केला होता आणि आता महिलाची राजकीय प्राशिक्षणाची जबाबदारीही म्हाळगी घेईल.  आताच्या महिला या न देवी न दासी आहेत त्यां आता भारताला नेतृत्व देणाऱ्या आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेनी महिला लोकप्रतिनिधी ना प्रशिक्षित करणं, स्वयंभू करणं हा उपक्रम राबविल्याच तसेच महिला बचत गटाच्या वस्तुंना तेरा जिल्ह्यात बाराही महिने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. उमेद मॉल ही संकल्पना राबवून महिला उद्यागाच सक्षमीकरण करणार असल्याचं ते म्हणाले.  दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाना राज्यातील पाचशे ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक महिला प्रतिनिधिनी उपस्थिती लावली. याठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करण्यात टाळाटाळ

डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करण्यात टाळाटाळ तीन तास उपचाराविना भटकंतीची वेळ जागतिक महिलादिनीच गर्भवती महिलेबाबत संतापजनक प्रकार योगेश चांदेकर पालघरः पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची अवस्था हा केवळ प्रशासनिक अपयशाचा मुद्दा नाही, तर तो मानवी हक्काशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. सरकार दरवर्षी आरोग्य सेवेसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करते. योजना घोषित होतात; परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आदी ठिकाणी वेळेवर डॉक्टर व अन्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना खासगी ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. अन्य जिल्ह्यात न्यावे लागते. वेळेवर उपचार मिळाल्याने अनेकदा रुग्णांचे मृत्यू होतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनीच एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून न घेतल्याचा संतापजनक प्रकार डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये  घडला असून, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आदिवासीबहुल विकासासाठी अर्थसंकल्पाच्या नऊ टक्के तरतूद केली जात असते. त्यात आदिवासी विभागातील आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद असते. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तरतूद होते, घोषणा होतात. नवनवीन रुग्णालय आणि प्राथमीक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उभारली जातात; परंतु प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा मिळत नाही, हा अनुभव नित्याचा झाला आहे. ग्रामीण, आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा डॉक्टर नसतात. नियुक्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी कायम गैरहजर असल्याच्या तक्रारी सातत्याने होतात. यावर विधिमंडळात व अन्य ठिकाणी चर्चा होते. हजारो कोटी रुपये खर्च करूनही आरोग्य सेवाच विकलांग आदिवासी विभागातील लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन येथे आरोग्य सेवा अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न असतो; परंतु हजारो कोटी रुपये खर्च करूनही सामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागते. पालघरसारख्या जिल्ह्यात तर अनेकदा उपचाराविना मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. चांगल्या आरोग्य सुविधा नसल्याने अनेकदा गोरगरीब नागरिकांना शेजारच्या नाशिक जिल्ह्यात किंवा ठाण्या-मुंबईला जावे लागते. बऱ्याचदा गुजरात राज्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी कुटुंबासाठी सरकारी रुग्णालयांचा आधार मिळण्याऐवजी येथेच त्यांची उपेक्षा केली जाते. असाच प्रकार डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडला आहे. फक्त डहाणूतच असे प्रकार होतात, असे नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्याची ही अशीच परिस्थिती आहे. आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून सरकारचे मात्र या गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे फारसे लक्ष नाही. पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतात. श्वानदंशावरील लस अनेकदा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत; परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. अंगणवाडी सेविकेची धावपळ आणि व्यथा वडकून येथीलअंगणवाडी सेविका शोभा माच्छी यांना रात्री बारा वाजता त्याच गावातील एका गर्भवती महिलेच्या बाळंतपणासंबंधात फोन आला. त्यांनी तात्काळ तिला डहाणूच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेले; परंतु येथे त्यांना सांगण्यात आले, की नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही. त्यामुळे लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. रुग्णवाहिकेची मागणी करताच ती मिळण्यासही दोन-तीन तास लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे नाइलाज म्हणून माच्छी यांनी संबंधित महिलेला घेऊन खासगी हॉस्पिटलकडे धाव घेतली. आधी ‘सेवा हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले, तर तेथेही डॉक्टर उपलब्ध नव्हते. ‘तिवारी हॉस्पिटल’ची कथाही तशीच होती. शेवटी ‘श्रद्धा हॉस्पिटल’मध्ये या महिलेला दाखल करण्यात आले. त्यात उपचाराविना तीन तास ही महिला विव्हळत होती.  डहाणू उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे एका महिलेला ॲडमिट करून न घेणे ही अतिशय गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. गरोदर मातांची नोंदणी झाल्यानंतर त्या हॉस्पिटल डॉक्टरांच्या आशेवर नऊ महिने सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहतात; पण प्रसूतीच्या वेळीच संबंधित डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अशा प्रकारची धावपळ करावी लागणे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. ‘सरकारने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या; परंतु ‘कॉटेज हॉस्पिटल’ सारख्या ठिकाणी एक हजार रुपये भरल्याशिवाय सिटीस्कॅन होणार नाही असे सांगण्यात येते. सिटीस्कॅन बाबत चौकशी करता संबंधित यंत्रणा गेले एक वर्षापासून सरकारने आम्हाला बील दिले नाही, असे सांगते. त्यामुळे एक हजार रुपये घ्यावे लागतात अशा प्रकारची भाषा केली जाते, हे खूप चिंताजनक आहे जितू पाटील, उपाध्यक्ष, श्रमजीवी संघटना, डहाणू तालुका ‘सामान्य माणसाला रोजच्या धावपळीतून वेळ काढून लोकप्रतिनिधींकडे अशा समस्या घेऊन जाणे शक्य होत नाही; पण माध्यमांनी असे गंभीर प्रश्न मांडून लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे तातडी लक्ष द्यावे. नाहीतर, विकासाच्या गप्पांना काहीच अर्थ नाही. एका गर्भवती महिलेला बाळंतपणाच्या वेळी रात्री या दवाखान्यातून त्या दवाखान्यांत फिरावे लागणे अत्यंत लाजिरवाणी बाब बाब आहे.…