धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक
मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले.
या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले.
विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२).
०००००००००
