निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार
कामगारांतर्फे संजय वढावकर यांचा सत्कार
अनिल ठाणेकर
ठाणे, रायगड जिल्ह्यामधील रोहा येथील निलिकॉन कंपनी व्यवस्थापन आणि जनरल मजदूर सभेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वेतन करारानुसार कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा मंजूर झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने कंपनीतील कामगारांनी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर आणि अध्यक्षा संज्योत वढावकर यांचा जाहीर सत्कार केला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
कामगारांना मिळालेल्या भरघोस पगारवाढीमुळे ठाणे येथील जनरल मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, कामगारांची एकजूट, संयम आणि संघटनेवरील विश्वास यामुळेच हा वेतन करार संपन्न झाला. कारखाना टिकला तरच कामगार टिकेल, अशी स्पष्ट भूमिका मांडून त्यांनी आपली संघटना ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायम खंबीरपणे उभी राहील. धाटाव एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये संघटनेने आत्तापर्यंत अनेक यशस्वी वेतनकरार केले असून, टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नोकऱ्या मिळवून देण्याचे काम केले आहे. संघटनेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी सांगितले की, कामगारांनी संघटित राहून आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, तरच आपणास न्याय मिळेल. सदर सत्कार सोहळ्यास शामकांत जोशी, जगदीश उपाध्ये, सुहास खरीवले, प्रशांत शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन निलिकॉन कामगार सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले होते. हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष भरत कोतवाल, उपाध्यक्ष जनार्दन राजीवले, सेक्रेटरी एच.पी. वर्मा तसेच नितीन रटाटे, अनंता ढमाल, चिंतामणी साळस्कर, लक्ष्मण भोकटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
