दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा?

श्रद्धा गॅस एजन्सीवर फसवणुकीचे आरोप

आरती परब

दिवा : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असताना, दिवा शहरात मात्र कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे. एचपी गॅसचा पुरवठा करणाऱ्या श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत.

दिव्यातील अनेक ग्राहकांनी सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करूनही त्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी झाल्याचे ओटीपी प्राप्त होऊन २५ ते ३० दिवस उलटूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळालेले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.

तक्रारींबाबत एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, श्रद्धा गॅस एजन्सीने दिवा व डोंबिवली येथील आपली कार्यालये बंद ठेवली असून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच एचपी गॅस कंपनीच्या सेल्स ऑफिसर चित्रा नायर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, Essential Commodities Act अंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *