नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार

हरिभाऊ लाखे

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. २०२६-२०२७ या वर्षी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विविध धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नियमित बससेवेव्यतिरिक्त दोन हजार ५०० पेक्षा अधिक बससेवेचे नियोजन करण्यात येत आहे.

कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. कुंभपर्वात पर्वणींना अधिक महत्व असते. भाविकांची संख्या प्रत्येक पर्वणीला २० लाखांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येणारे भाविक खासगी वाहनाने, रेल्वे तसेच बसने येतील. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाहेर गावहून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

महामंडळाच्या ताफ्यात या काळात जिल्ह्यातील विविध आगारासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दोन हजार ५०० जादा बस मागविण्यात येणार आहेत. या बस चालविण्यासाठी २० हजारांहून अधिक कर्मचारी सेवा बजावणार आहेत. नाशिक तसेच त्र्यंबकमध्ये पर्यटक तसेच भाविक खासगी वाहनांनी दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाहेरगावाहून येणारी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बस या थेट त्र्यंबक तसेच नाशिकमध्ये दाखल न होऊ देता ती बाहेर कुठे थांबविता यावीत, यासाठी वाहनतळाचे नियोजन सुरू आहे.

राज्य परिवहन महामंडळ, नाशिक महानगरपालिका, पोलीस विभाग, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त यांच्या वतीने सध्या नाशिक तसेच त्र्यंबक या ठिकाणी खासगी वाहने कुठे उभी करता येतील, यासंदर्भात तसेच वाहनातून उतरलेल्या पर्यटकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अमृत स्नानासाठी घाट परिसरात ने-आण करण्याची व्यवस्था याचे नियोजन सुरू आहे. या वाहनांमुळे शहर परिसरासह त्र्यंबक नगरीत वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, महामंडळाच्या वतीने २० हजार कर्मचाऱ्यांसाठी वेगववेगळ्या मंगल कार्यालय, लॉन्स यासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे.

मागील कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ पर्वणीसाठी येणाऱ्या बसेस, खाजगी वाहने पहिने नजीक थांबवल्या जात होत्या. तेथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बस या काही विशिष्ट अंतरावर भाविकांना सोडत. एक किलोमीटर अंतर पायी चालावे लागत हाेते. नाशिक मध्येही याच धर्तीवर नियोजन होते. यंदा भाविकांची तसेच पर्यटकांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासन काय करत या कडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *