नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन 


वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. शासनाच्या  योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन जिल्ह्याचे  पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील भटवाडी येथे या ‘नमो उद्यान’चा भूमिपूजन समारंभ राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दर्जेदार व सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘नमो उद्यान’ विकसित करा. या आराखड्यात पर्यावरणपूरक नियोजन, नागरिकांसाठी विरंगुळ्याची आधुनिक साधने तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा यांचा समावेश या उद्यानात करण्यात येणार असून, हा प्रकल्प राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.  नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत केले. सुहास गवंडळकर, गौरी मराठे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राणे यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *