ठाणे, गेली पाच दशके सिडको ते कळवा पूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या खाडीतील गाळ काढून खाडी लगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण आदी कामे करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
येथील भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले होते. गेल्या काही दशकांत या खाडीचा गाळ उपसण्यात आलेला नसल्याने खाडीची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. या पार्श्वभूमीवर श्री.केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, अरीफ बडगुजर आदी उपस्थित होते. या खाडीलगत मुख्य ठाणे वसले असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *