– पंचवटीतील प्रस्तावित वृक्षतोडीवर शंभरहून अधिक हरकती
हरिभाऊ लाखे
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंचवटी परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी हरकतींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. रस्ते रुंदीकरणासाठी तब्बल ५८४ वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर शंभरहून अधिक हरकती प्राप्त झाल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. वृत्तपत्र सदस्यता
तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच महापालिकेने नव्याने पंचवटीतील नांदूर गाव ते नांदूर नाका आणि नांदूर नाका ते जत्रा चौक या मार्गावर १९७ वृक्ष, पेठ रोड ते आरटीओ कॉर्नर, आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी स्कूल आणि नीलगिरीबाग या मार्गावर ३८७अशा प्रकारे एकूण ५८४ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे.
रस्ते रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, संबंधित वृक्षांवर लाल खुणा करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी प्राथमिक खोदकामालाही सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती.
या कालावधीत पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेले आहेत. विशेषतः करंज, कडुनिंब, आंबा, जांभूळ, गुलमोहर, सोनमोहर, बकुळ, बेल यांसारख्या वृक्षांच्या तोडीला विरोध होत आहे. काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत असला, तरी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरेल, अशी भूमिका हरकतदारांनी घेतली आहे. यापूर्वी तपोवन येथे साधुग्रामसाठी प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी १८२५ वृक्ष तोडीचा मुद्दा गाजला होता. तो सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यातच आता पंचवटीतील नव्या वृक्षतोडीच्या प्रस्तावामुळे पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी लवकरच होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते. नागरिकांच्या आक्षेपांना कितपत न्याय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
