उल्हासनगर ( सुनिल इंगळे ): उल्हासनगर शहरात मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नुकताच उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील साईनाथ नगर यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट कुत्र्याने एका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याच्या पायाचा लचका तोडून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. त्याच परिसरात यापूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी काही जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती. या मोकाट आणि चावक्या कुत्र्यांचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रस्त्यावरील मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव मनोज भाऊसाहेब मालुंजकर (४० ) असे आहे. मनोज हे उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ रिसरातील कुर्ला कॅम्प हनुमान मंदिराजवळ आपल्या कुटुंबास राहतात. ते मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळामध्ये काम करतात. ते नेहमी सकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास जिमला जात असतात. काल सकाळी सहाच्या सुमारास ते जिम वरून घरी परत येत असताना साईनाथ नगर यादव चाळ येथील रोडवरील ५ ते ६ मोकाट कुत्र्यांची टोळी बसली होती. त्या टोळीतील एका काळ्या कुत्र्याने मनोज यांच्यावर अचानक हल्ला केला. त्या कुत्र्याने मनोज यांच्या उजव्या पायाला जबरी चावा घेऊन त्यांच्या पायाचा लचका तोडला. रक्तरंजित झालेल्या अवस्थेत मनोज यांनी त्या मोकाट कुत्र्याचा प्रतिकार केल्यामुळे त्या कुत्र्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मनोज यांनी त्वरित रुग्णालयात जाऊन उपचार करून घेतले आहेत. याआधी देखील हनुमान नगर मंदिर परिसर, साईनाथ नगर व यादव चाळ या ठिकाणी रस्त्यावरील मोकाट व चावक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे पहाटेच्या सुमारास व रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून जाणे देखील मुश्किल झाले आहे. याशिवाय हे मोकाट कुत्री लहान मुलांना देखील चावा घेण्यासाठी पाठलाग करीत असतात. मनोज मालुंजकर यांनी या मोकाट कुत्र्या संदर्भात काहीतरी उपयोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेविका अंजली साळवे व सुरेखा सुरेश सोनावणे यांच्याकडे विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *