२,५०० नागरिकांनी घेतला विविध शासकीय सेवांचा लाभ

कल्याण : जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने व सुलभ पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २,५०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, “शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नयेत; त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे.” या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या (पुरवठा विभाग), सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनासेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, वन व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *