मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान

हरिभाऊ लाखे
नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक होण्याचे आवाहन करतानाच ते कायमच मुस्लिमांना लक्ष्य करतात. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित विराट हिंदू मेळाव्यातही त्यांनी आपली ही परंपरा कायम राखली. यावेळी हिंदू एकजुटीचे गुणगान गाताना नितेश राणे यांनी लव्ह जिहादसारख्या प्रकरणांसाठी बाॅलीवूडमधील खान मंडळींना जबाबदार धरले.
मंत्री नितेश राणे यांनी विराट हिंदू मेळाव्यात मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली. हिंदूराष्ट्र म्हणून आपण जागृत झालो नाही, संघटित झालो नाहीत, तर आजूबाजूच्या वातावरणाचा फटका बसू शकतो. हिरव्या सापांना वेळीच ठेचले नाही तर ते आपल्या घरापर्यंत येऊन पोहचतील. तेव्हां आपण काहीच करु शकणार नाहीत. आमच्या या हिंदूराष्ट्रात सर्वधर्मसमभावाची कोणतीही टेप लावायची नाही.
हिंदूराष्ट्रात सर्वप्रथम हिंदुंचे हित पाहिले जाईल. भाईचारा वगैरे आम्हाला शिकविणाऱ्या लोकांनी गप्प बसावे. हिंदूराष्ट्रात हिंदू म्हणून संघटित न झाल्यास आजूबाजूला काय चाललंय ते बघा, असे म्हणत राणे यांनी नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतरणासाठी येणारा दबाव, याचे उदाहरण दिले. हिंदू भगिनींना धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडणे, त्यांना दुसऱ्या धर्माची प्रार्थना म्हणावयास लावणे, त्यांना हिजाब घालायला लावणे, हे करण्यासाठी त्यांना नोकऱ्या दिल्या का, या विषयावर आम्ही बोलायचे नाही काय, असे प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केले.
हिंदू भगिनींचे शोषण करणारे कोणीही असो, त्यांना शिक्षा करा. शेकडो हिंदू भगिनींचे शोषण करणाऱ्या खरातलाही जाहीररित्या फाशी द्या, खरातचे कोणीही समर्थन करणार नाही. कोणत्याही हिंदुंनी खरातचे समर्थन केलेले नाही. परंतु, टीसीएस कंपनीतील संशयितांना कोर्टात नेले असता, कोर्टाबाहेर सहाशे मुस्लिम त्यांच्या समर्थनार्थ जमले होते, असा दावा राणे यांनी केला.
याचा सर्व हिंदुंनी विचार करायला पाहिजे. बॉलिवूडमधील खान मंडळींच्या चित्रपटांनी लव्ह जिहाद पसरविला, असे म्हणत नितेश राणे यांनी सलमान खान, आमिर खान यांचे नाव घेतले. हिंदुंना कसे टार्गेट करायचे, हे या खान मंडळींनी चित्रपटांमधून दाखविले. आता मात्र बदल होत आहे. आमचे धुरंदर, छावा त्यांच्यावर भारी पडत आहेत. आपण सर्वांनीही चित्रपट पाहणार तर हिंदुंचेच पाहणार, बाकीच्यांना घरी बसविणार, ही भूमिका घ्यावी. रणवीरसिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पाहण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे नाव कोणी खराब करीत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या मेळाव्यातप्रसंगी राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार दिलीप बनकर यांनी मंत्री राणे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *