बोस्टनमध्ये शेफ विष्णू मनोहर यांचा डंका
राजेंद्र हुंजे
बोस्टन: भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आयुर्वेद आणि सात्विक आहार होय. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. म्हणूनच, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानून त्याचा औषधाप्रमाणे वापर केल्यास आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो,’ असे प्रतिपादन विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केले. अमेरिकेच्या बोस्टन शहरातील ‘अपर्णा जोशी यांच्या संकल्पनेवर आधारित केलेल्या टेस्ट ऑफ आयुर्वेद’ महोत्सवात ते बोलत होते. ओमग्राम आयुर्वेद आयोजित या सोहळ्यात विष्णू मनोहर यांनी पाश्चात्य जगाला भारतीय मसाल्यांमधील विज्ञान आणि सात्विक जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत खऱ्या अर्थाने ‘आहार क्रांती’चा शंखनाद केला.
विष्णू मनोहर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक काळात वाढणारा मानसिक तणाव आणि शारीरिक व्याधींवर आयुर्वेद हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. त्यांनी तयार केलेल्या सात्विक पदार्थांच्या सुगंधाने आणि चवीने केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी नागरिकही भारावून गेले होते. विष्णू मनोहर यांच्या पाककलेचा तडका आणि आरोग्याचा मंत्र यांचा हा अनोखा संगम बोस्टनच्या भूमीवर सुवर्णयोग ठरला आहे.
बोस्टनमध्ये आयोजित या महोत्सवात केवळ माहिती न देता सहभागींना प्रत्यक्ष पंचकर्म आणि योगसाधनेचा अनुभव देण्यात आला. आधुनिक धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांतता कशी मिळवावी, याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात आले. आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्धीसाठी कशी उपयुक्त ठरते, हे तज्ज्ञांनी पटवून दिले. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, सहभागी नागरिकांच्या आरोग्याची पुढील ३ महिने अनुभवी वैद्यांच्या देखरेखीखाली काळजी घेतली जाणार आहे. या सातत्यपूर्ण फॉलोअप कार्यक्रमामुळे पाश्चात्य नागरिकांना आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीवर नवा विश्वास निर्माण झाला असून, खऱ्या अर्थाने आरोग्याचा जागर येथे पाहायला मिळत आहे.
अमेरिकेच्या बोस्टन शहरात आज केवळ भारतीय चवींचाच नाही, तर मराठी संस्कृतीचाही मोठा दिमाख पाहायला मिळाला. पारंपरिक नऊवारी साड्या, नथ आणि सुवर्णालंकारांनी सजलेल्या महिलांनी बोस्टनच्या रस्त्यांवर भारतीय वेशभूषेचा रुबाब सातासमुद्रापार नेला. विशेष आयोजित फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे जे दर्शन घडले, त्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आहार क्रांती’ संकल्पनेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमाने चोख बजावले आहे. परदेशात राहूनही आपला सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठी बांधवांच्या उत्साहामुळे अमेरिकन भूमीवर भारतीय अस्मितेचा डंका वाजला असून, या सोहळ्याने पाश्चात्य नागरिकांनाही भारतीय परंपरेच्या प्रेमात पाडले आहे.
