सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन प्रभारी डीन चे अनेक घोटाळे उघड…!
राजन चव्हाण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी डीन डॉ. मनोज जोशी यांच्या कार्यकाळातील अनेक घोटाळे समोर आले असून राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आता याप्रकारणी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.
या तत्कालीन प्रभारी डीन च्या मनमानी व बेताल कारभाराबाबत सर्व अधिकारी कर्मचारी आणि डॉक्टरांसोबत असभ्य, अपमानास्पद व दहशतीची वर्तणूक करण्याबाबतचे चार पानी सविस्तर निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले होते.
या निवेदनावर कॉलेजचे अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर्स अशा तब्बल ४५ जणांच्या
सह्या आहेत. या निवेदनात डॉ. जोशी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून शासन स्तरावर याची दखल घेण्यात आली आहे.
दरम्यान विद्यमान प्रभारी डीन डॉ. अनंत दवंगे यांनी कांही महिन्यांपूर्वी प्रभारी डीन म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर या निवेदनाच्या अनुषंगाने दवंगे यांनी या सर्व घोटाळ्यांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी सखोल चौकशी करून उपलब्ध कागदपत्रे व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचे जाबजबाब नोंदवून संपूर्ण अहवालच शासनाला सादर केला आहे.त्यावरूनच आता वरील आदेश जारी करण्यात आले आहेत.
शासनाला पाठवण्यात आलेल्या या तपशीलवार निवेदनात जोशींच्या कारकिर्दीत झालेल्या खरेदीत फार मोठे घोटाळे असल्याचे समोर आले आहे आणि या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मृतदेह घोटाळा..?
सन २०२३ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव यांनी प्रा. जोशी यांना मिरज येथून मेडिकल कॉलेजसाठी 5 मृतदेह आणण्यास सांगितले होते जोशी यांनी ते आणले मात्र प्रत्यक्षात दोनच मृतदेह कॉलेज कडे हसतांतरित केले. डीन डॉ. गुरव यांनी या प्रकरणी सत्यता जाणून घेतल्यानंतर डॉ. जोशी यांनी तीन मृतदेह त्यांच्या मित्राच्या खाजगी मेडिकल कॉलेजला परस्पर दिल्याचे उघडकीस आले. संतप्त झालेल्या डीन गुरव यांनी याची गंभीर दखल घेत जोशी यांना जाब विचारताच त्यांनी उर्वरित तिन्ही मृतदेह सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये आणून दिले.
विशेष म्हणजे जोशी यांचा प्रोबेशन कालावधी सुरु असताना ही घटना व अशा अनेक गंभीर घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जोशी हे प्रभारी डीन म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे, त्यांच्या मनमानी कारभाराचे उल्लेख निवेदनात आहेत.
काही कोटी रुपयांचा पुस्तकं खरेदी घोटाळा हा त्यांच्याच कारकिर्दीत झाला असल्याचा आरोप असून या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आल्याचे समजते.
त्यांच्याच काळात झालेला स्टेशनरी घोटाळा हा कांही लाखांच्या घरात असून यासंबंधी चौकशी केली असता ही खरेदी नियमबाह्य झाल्याचे चौकशीत आढळून आले असून हे बिल मिळावे यासाठी विद्यमान अधिष्ठाता यांचेवर राजकीय दबाव आणून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत.
